लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : भरधाव दोन प्रवासी वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने एकजण गंभीर, तर तीन जण जखमी झाले. ही घटना पातूर शहरापासून पाच कि.मी. दूर असलेल्या चिंचखेडजवळ गुरुवारी सकाळी ११ वाजता घडली.आसेगाव येथून अकोला येथे जात असलेली प्रवासी वाहन क्रमांक एमएच ३७ जे ५३९ ला पातूरकडून मेडशीकडे जात असलेली दुसर्या प्रवासी वाहनाने जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतर धडक देणार्या प्रवासी वाहनचालकाने वाहनासह पळ काढला. आसेगाव येथून येत असलेल्या प्रवासी गोपाल डिगांबर शिरसाट हे गंभीर जखमी झाले असून, करण थोरात, भगत मानोरकर, ज्ञानेश्वर देशमुख हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची भीषणता एवढी होती, की या अपघातात गोपाल शिरसाट यांच्या पायाचा अंगठा व एक बोट जागेवरच तुटून पडले. अपघाताची माहिती मिळताच जखमींना शहरातील हुसेनखा युसूफखा यांनी त्वरित एका वाहनाने पातूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता तत्काळ घेऊन आले. पुढील उपचाराकरिता जखमींना अकोला येथे रवाना करण्यात आले असून, वृत लिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.
वैद्यकीय अधिकार्यांची दांडीया अपघातातील जखमींना हुसेनखा युसूफखा यांनी त्वरित उपचार मिळावा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता, नेहमीप्रमाणे ११ वाजतासुद्धा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी तथा स्टाफ उपस्थित नव्हता. केवळ बालाजी गव्हाणे फार्मासिस्ट उपस्थित होते. याचवेळी देऊळगाव येथील एका युवकाने विष प्राशन केले असल्याने त्यालासुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणलेले होते; मात्र वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे जखमींना व विष प्राशन केलेल्या युवकाला त्वरित अकोला येथे रवाना करण्यात आले.