अकोला : लॉकडाऊनची बंधने शिथील झाल्यानंतर अनलॉक प्रक्रियेअंतर्गत रेल्वेने प्रवासी वाहतुक सुुरु केली असली, तरी सध्या केवळ आरक्षणावरच प्रवास करण्याची सुविधा असलेल्या विशेष गाड्या धावत आहेत. सर्वसामान्यांमध्ये लोकप्रीय असलेल्या पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे सामान्य प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे. विशेष गाड्यांचे भाडेही अधिक असल्याने या गाड्यांमध्ये प्रवास करताना गरीब प्रवाशांची होरपळ होत आहे.लॉकडाऊनदरम्यान रेल्वेचे प्रवासी वाहतुक बंदच होती. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याच्या पृष्ठभूमीवर रेल्वेने एका राज्यातून दुसर्या राज्यात जाण्यासाठी विशेष गाड्या सुरु केल्या असून, या गाड्यांमध्ये राज्यांतर्गत प्रवास करण्याचीही मुभा आहे. मध्य व दक्षीण मध्य रेल्वेचे जंक्शन स्टेशन असलेल्या अकोल्यावरूनही विशेष गाड्या धावत असल्यामुळे प्रवाशांची सोय झाली. तथापी, केवळ आरक्षीत तिकीटांवरच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करता येतो. वेळेवरच्या प्रवासासाठी आरक्षण उपलब्ध होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांना या विशेष गाड्यांचा उपयोग होत नसल्याचे वास्तव आहे. लॉकडाऊनपूर्वी सुरु असलेल्या पॅसेंजर गाड्या गरीब प्रवाशांसाठी उपयुक्त होत्या. आता या गाड्या बंद असल्यामुळे गरीब प्रवाशांची गैरसोय होत आहे.
विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस सुरु
सध्या अकोला मार्गे विशेष गाड्या धावत असून, या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या विदर्भ एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, हावडा-अहमदाबाद, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, तर दक्षीण-मध्य रेल्वेच्या नांदेड-श्रीगंगानगर, जयपूर-सिकंदराबाद, अमरावती-तिरुपती आदी गाड्यांचा समावेश आहे.
वर्धा-भूसावळ पॅसेंजर बंद
लॉकडाऊनपूर्वी अकोला स्थानकावरून भूसावळ-वर्धा, नरखेड-भूसावळ या मध्य रेल्वेच्या पॅसेंजर गाड्या सुरु होत्या. या दोन्ही गाड्या प्रवाशांसाठी सोयीस्कर व भाड्याच्या दृष्टीने परवडणार्या होत्या. याशिवाय दक्षीण-मध्य रेल्वेच्या अकोला-पूर्णा व अकोला-परळी या पॅसेंजर गाड्याही प्रवाशांसाठी उपयुक्त होत्या. आता या गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
पॅसेंजर गाड्या बंद असल्याने विशेष गाड्यांमधून अधिक भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. आयत्या वेळी प्रवास करावयाचा झाल्यास प्रवाशांना एसटी बस किंवा खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. पॅसेंजर गाड्यांचे भाडे सामान्यांच्या खिशाला परवडणारे आहे. त्यामुळे या गाड्या सुरु करण्यात याव्या.
- अमोल इंगळे, प्रवासी संघटना