रुग्णांची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:38 AM2017-08-18T01:38:00+5:302017-08-18T01:39:07+5:30

अकोला : जिल्हय़ातील गरीब रुग्णांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही. आरोग्याच्या योजनेंतर्गत असणार्‍या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ रुग्णांना प्राधान्याने द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांना केली.

Patients will not be tolerated! | रुग्णांची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही!

रुग्णांची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही!

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांचे निर्देश आरोग्य विभागाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ातील गरीब रुग्णांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही. आरोग्याच्या योजनेंतर्गत असणार्‍या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ रुग्णांना प्राधान्याने द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांना केली.
नियोजन भवनात बुधवारी आरोग्यविषयक सर्व समित्यांच्या आयोजित एकत्रित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्यविषयक समितीचे सभापती जमीर उल्ला खॉ पठाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौहान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदींसह तालुका आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली धडक मोहिमेंतर्गत रुग्णालये तपासणी जिल्हास्तरीय समिती, जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती, नियमित लसीकरण सक्षमीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय जंतनाशक मोहीम कार्यक्रम, अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम, जिल्हास्तरीय लोकसंख्या धोरण समन्वय समिती, जिल्हा गुणवत्ता आश्‍वासन कार्यक्रम, कुष्ठरोग शोध अभियान, राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत असणारे कार्यक्रम, आशा कार्यक्रम, सिकल सेल कार्यक्रम, रुग्ण कल्याण समिती आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. 
लसीकरण मोहीम ग्रामीण व शहरी भागात प्रभावीपणे राबवावी. अतिसार प्रभावित क्षेत्रात आरोग्य सुविधा दक्षतेने पुरवाव्यात. संभावित पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अतिसाराचा प्रसार होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी. माता व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
 जननी सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना वेळेत लाभ द्यावा. आशा सेविकांची रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. सिकलसेलच्या रुग्णांची दक्षतेने तपासणी करा, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी या बैठकीत दिले.

त्रुटींची पूर्तता न करणार्‍या रुग्णालयांवर कारवाई
प्रारंभी रुग्णालय तपासणी धडक मोहिमेंतर्गत त्रुटी आढळलेल्या जिल्हय़ातील १00 रुग्णालयांना जारी केलेल्या नोटिसा व त्याला अनुसरून केलेल्या त्रुटींची पूर्तता यावर चर्चा झाली. पीसीपीएनडीटीच्या कायदेविषयक सल्लागार अँड. शुभांगी खांडे यांनी त्रुटी आढळलेल्या रुग्णालयांनी नोटिसीला अनुसरून काय कारवाई केली, याबाबत माहिती दिली.
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी  १५  मार्च २0१७ ते १९ मे २0१७  या कालावधीत त्यांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालये / दवाखान्यांची तपासणी केली होती. तपासणीत त्रुटी आढळलेल्या रुग्णालयांना नोटिस पाठविण्यात आल्या होत्या. यापैकी नोटिसा पाठविलेल्या अकोट येथील १८ पैकी १८ रुग्णालयांनी खुलासा दिला. बाळापूर येथील ४0 पैकी २६ रुग्णालय, मूर्तिजापूर येथील ८ पैकी ७  रुग्णालय आणि अकोला ग्रामीण (सर्व तालुके) मधील ३४ पैकी १९ रुग्णालयांनी खुलासा दिला. ज्या रुग्णालयांनी त्रुटीची योग्यरीत्या पूर्तता केलेली नाही, अशा रुग्णालयांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

Web Title: Patients will not be tolerated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.