अकोला : विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स अकोल्याच्या पुढाकाराने व सर्व व्यापारी संघटनांच्या एकमताने २५ ते २९ पर्यंत जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली असली तरी किरकोळ दुकानांसह गल्लीबोळातील विविध प्रतिष्ठाने सर्रास सुरू होती. रस्त्यावरची वर्दळ कायमच होती. त्यामुळे जनतेनेच जनता कर्फ्यू नाकारल्याचे चित्र पहिल्याच दिवशी दृष्टीस आले. त्यामुळे विदर्भ चेंबर्स आॅफ कॉमर्सने रात्री उशीरा पत्रक काढून हा जनता कर्फ्यू मागे घेत असल्याचे जाहीर केले. जनता कर्फ्यूसंदर्भात राजकीय पक्ष, लहान व्यापारी यांची नकारात्मक भूमिका असल्याने जनता कर्फ्यूचे स्वरूप कसे राहील, याबाबत संभ्रम होताच. त्यामुळे जनता कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला.सराफा बाजार, दाणा बाजार, न्यू क्लाथ मार्केट, जुना भाजी बाजार बंद होता; मात्र गांधी रोड, टिळक रोड, डाबकी रोड, उमरी रोड, जठारपेठ चौक, नेकलेस रोड, गोरक्षण रोड, मोहम्मद अली रोडवरील अनेक प्रतिष्ठाने सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेतील वर्दळ मंदावल्याचे चित्र नव्हते. टिळक रोड, ताजनापेठ, गांधी रोड, रेल्वे स्टेशन मार्गासह बसस्थानकावरही नागरिकांची गर्दी दिसून आली. नाभिक समाजाचेही प्रतिष्ठाने सुरू होती. पेट्रोल पंप, दारूची दुकाने नेहमीप्रमाणेच सुरू होती.
या परिसरातील दुकाने सुरूच!एमआयडीसी परिसरातील कारखाने, रिक्षा, बस, पानपट्टी, चहाची हॉटेल्स, अनेक लहान-मोठी कापड व जनरल स्टोअर्स सुरू होती. गांधी रोडवर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह ते फतेह चौकदरम्यान अर्ध्यापेक्षा जास्त दुकाने सुरूच होती. मो. अली रोड व सुभाष रोडवर जनता कर्फ्यूचा लवलेशही नव्हता. भाजी बाजारात रात्री आलेल्या मालाची हरासी रात्रीच झाली; मात्र सकाळी जनता बाजारात फळांचा लिलावही झाला.