अकोला : देशासाठी बलिदान दिलेल्या जिल्ह्यातील वीरपुत्रांच्या स्मरणार्थ शहरात भव्य शहीद स्मारक उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी गुरुवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकर, उपजिल्हाधिकारी महसूल गजानन सुरंजे उपस्थित होते.
जिल्ह्यातील २४ शहिदांचे सतत स्मरण व प्रेरणा मिळावी, यासाठी शहरातील नेहरू पार्कजवळील शहीद स्मारकाचे नूतनीकरण करून शहिदांचे पुतळे त्यांच्या कार्याच्या माहितीसह उभारण्यात येणार आहेत. याठिकाणी दोन फवारे तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पाॅइंटदेखील तयार करण्यात येणार आहे. स्मारकाच्या ठिकाणी उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येणार असून, अग्रस्थानी रणगाडा ठेवण्यात येणार आहे. यासाठी करण्यात आलेले नियोजनाचे सादरीकरण पालकमंत्र्यांना दाखविण्यात आले. त्यावेळी त्यांनी त्यात काही बदल करण्याचे सुचविले. तसेच स्थानिक जिल्हा स्त्री रुग्णालयात सोई सुविधांयुक्त आधुनिक रुग्णालय तयार करण्याचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. जिल्ह्यतील पाणंद रस्ते विकास आराखड्याबाबतही यावेळ चर्चा करण्यात आली.