रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्सचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 03:05 PM2019-10-28T15:05:27+5:302019-10-28T15:05:40+5:30
प्लेटलेटसाठी एका रक्तपेढीवरून दुसऱ्या रक्तपेढीकडे चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे.
अकोला : जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच रक्तदात्यांअभावी शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्त आणि रक्तघटकांचा विशेषत: प्लेटलेटचा तुटवडा असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना प्लेटलेटसाठी एका रक्तपेढीवरून दुसऱ्या रक्तपेढीकडे चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे.
गत काही दिवसांपासून बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारासोबतच डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे साधा तापही आला, तरी रुग्ण तत्काळ रुग्णालयात धाव घेत आहे. डेंग्यूची लागण झाल्याने अनेक रुग्णांत रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होते. त्यामुळे रुग्णाला बाहेरून प्लेटलेट घ्याव्या लागतात. १ आॅक्टोबर रोजी ऐच्छिक रक्तदान दिवस साजरा करण्यात आला, तसेच ऐच्छिक रक्तदान पंधरवडाही साजरा करण्यात आला. या निमित्ताने रक्तदान शिबिर, विविध कार्यक्रम घेण्यात आले; मात्र डेंग्यूच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे होणारे रक्तदानही अपुरे पडत आहे. संकलित होणारे रक्त काही दिवसांतच संपून जात आहे. येथील शासकीय रक्तपेढीसह इतर खासगी रक्तपेढ्यांमध्येही प्लेटलेट्सचा तुटवडा असल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांना सांगण्यात येते. त्यामुळे रुग्णांना प्लेटलेट्ससाठी एका रक्तपेढीतून दुसºया रक्तपेढीमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. निगेटिव्ह रक्तगटाच्या रुग्णांना प्लेटलेट्स मिळणे कठीण झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची पंचाईत झाली आहे.
प्लेटलेट्सची मुदत केवळ पाच दिवसांची
जिल्ह्यातील रक्तपेढ्यांकडून बºयापैकी रक्तसंकलन केले होते. रुग्णाच्या गरजेनुसार, रक्तपेढ्यांकडून रक्ताच्या विविध घटकांचा पुरवठा केला जातो; मात्र प्लेटलेट्सची मुदत केवळ पाच दिवसांची असल्याने रक्तातील हा घटक जास्त प्रमाणात साठवून ठेवण्यात येत नाही.
प्लेटलेट्सचा तसा तुटवडा नाही. रक्तातील प्लेटलेट्सची मुदत केवळ पाच दिवसांची असल्याने ते जास्त प्रमाणात साठवून ठेवणे शक्य नाही. रुग्णांची संख्या वाढल्यास काही ठिकाणी अडचणी येऊ शकतात. रुग्णांच्या नातेवाइकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून इतर रुग्णांना योग्य वेळी रक्त व प्लेटलेट्स मिळतील.
- डॉ. महेंद्र तामने, अध्यक्ष, डॉ. हेडगेवार रक्तपेढी, अकोला.