‘खेळा मदतीसाठी’ : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले खेळाडू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 02:15 PM2019-08-27T14:15:48+5:302019-08-27T14:16:08+5:30
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूकडून शंभर रुपये जिल्हा प्रशासन घेणार आहे.
अकोला: पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात मदत करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाने ‘खेळा मदतीसाठी’ हा अभिनव उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमांतर्गत आयोजित स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूकडून शंभर रुपये जिल्हा प्रशासन घेणार आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध संस्थांनी आपल्या स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करू न, प्रत्येक सहभागी खेळाडूंकडून १०० रुपये सहभाग शुल्क भरू न हा निधी जमा करावयाचा असून, तो मदतनिधी पूरग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने २९ आॅगस्ट रोजी विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, क्रीडा संस्था, संघटना, बँक कर्मचारी संघटना व समाजातील सर्व व्यक्तींचे समूह यांनी आपल्या स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावयाचे आहे. त्या निमित्ताने सहभागी होणारे स्पर्धक, क्रीडापटू यांच्याकडून किमान १०० रुपये नाममात्र सहभाग शुल्क घेऊन, संकलन होणारी संपूर्ण रक्कम गुणवत्ता विकास कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे सहभागी स्पर्धकांच्या यादीसह जमा करण्यात येणार आहे. संकलित संपूर्ण रक्कम पूरग्रस्त निधी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला प्रदान करण्यात येणार आहे. शंभर रुपये किंवा अधिक निधी देणाºया क्रीडापटूंना जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र व स्पर्धा आयोजित करणाºया संस्थेला गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. खेळा मदतीसाठी (प्ले फॉर चॅरिटी) या घोषवाक्यांतर्गत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या आयोजनाबाबत कुठल्याही प्रकारची सक्ती नसून, स्वेच्छेने आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांच्या नेतृत्वात हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.