जुने शहरात पाण्यासाठी नागरिकांचे हाल; टॅंकर येताच धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 10:54 AM2021-05-30T10:54:47+5:302021-05-30T10:55:04+5:30
Water Scarcity in Akola City : जुने शहरातील बहुतांश भागात पाण्याअभावी गरीब नागरिकांचे हाल हाेत आहेत.
अकाेला : शहरात सत्तापक्ष व मनपा प्रशासनाकडून ‘अमृत अभियान’अंतर्गत जलवाहिनीचे जाळे टाकण्याचा गवगवा केला जात असला तरी अद्यापही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पाणी पाेहाेचले नसल्याची परिस्थिती आहे. जुने शहरातील बहुतांश भागात पाण्याअभावी गरीब नागरिकांचे हाल हाेत आहेत. अशा भागात मनपाचे टॅंकर पाेहाेचताच पाण्यासाठी महिलांसह पुरुष व लहान मुलांची धावाधाव हाेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा व्हावा,यासाठी केंद्र शासनाने ‘अमृत अभियान’अंतर्गत जलवाहिनीचे जाळे बदलणे व नवीन आठ जलकुंभांची उभारणी करण्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त भूमिगत गटार याेजनेचाही समावेश आहे. दरम्यान, जलवाहिनीचे जाळे बदलणे व नागरिकांपर्यंत पाणीपुरवठा करण्याच्या कामाला २०१७ मध्ये प्रारंभ झाला. दाेन वर्षात हे काम पूर्ण करण्याची मुदत असताना अद्यापही या कामाचे भिजत घाेंगडे कायम असल्याचे दिसत आहे. परिणामी गरजू नागरिकांना अद्यापही पाणीपुरवठा हाेत नसल्याने त्यांची पाण्यासाठी धावाधाव हाेत आहे. जुने शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील श्रध्दा काॅलनी, जाजू नगर, अंबिका नगर परिसर, राव नगर, प्रभाग ९ मधील आरपीटीएस राेड, भगिरथ वाडी यांसह प्रभाग क्रमांक १ मधील वाकापूर, नायगाव, शिलाेडा, प्रभाग क्रमांक २ व प्रभाग ३ मधील परिसरात पाणीटंचाईची समस्या आहे. संबंधित प्रभागात जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा हाेत नसल्यामुळे मागील काही दिवसांपासून मनपाच्यावतीने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
पाण्यासाठी नागरिकांची झुंबड
मनपाच्यावतीने पाणीटंचाई असलेल्या प्रभागांसाठी दरराेज टॅंकरच्या किमान २२ फेऱ्या हाेतात. याव्यतिरिक्त खासगी टॅंकरद्वारेही पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती आहे. प्रभागात टॅंकर येताच पाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असल्याचे पहावयास मिळत आहे.
मनपाकडून शुल्काची आकारणी नाही !
मनपाकडून गरजू नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असताना त्याबदल्यात काेणतेही शुल्क आकारले जात नाही. केवळ खासगी टॅंकरधारकांकडूनच ४०० ते ८०० रुपये शुल्क वसूल केले जात आहे.