- संतोष येलकर
अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) याेजनेंतर्गत बॅंक खात्यात रक्कम जमा झालेल्या शेतकऱ्यांपैकी आयकरदाते शेतकरी आणि विविध कारणांमुळे अपात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ८ हजार २६ शेतकऱ्यांकडून ४ कोटी ८९ लाख रुपयांची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे.
केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २ हजार रुपये प्रती महिनाप्रमाणे चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा केली जाते. या योजनेंतर्गत आयकर भरणारे शेतकरी तसेच अपात्र, मयत व चुकीने लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याचा आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात ऑनलाइन नोंदणी केलेल्या २ लाख २८ हजार ८८२ शेतकऱ्यांपैकी आयकरदाते शेतकरी तसेच नोंदणी करताना चुकीची माहिती सादर करणाऱ्या जिल्ह्यातील ८ हजार २६ शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांकडून त्यांनी योजनेंतर्गत लाभापाेटी घेतलेली ४ कोटी ८९ लाख रुपयांची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.
आयकरदाते व अपात्र शेतकऱ्यांची अशी आहे संख्या!
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील आयकरदाते शेतकरी तसेच ऑनलाइन नोंदणी करताना चुकीची माहिती सादर करणारे शेतकरी व मयत शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये आयकरदाते ४ हजार २२३ शेतकरी व इतर कारणांमुळे अपात्र ठरलेल्या ३ हजार ८०३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय असे आहेत पात्र शेतकरी!
तालुका शेतकरी
अकोला ३८३९६
अकोट ३८४८०
बाळापूर ३०५७७
बार्शीटाकळी ३०६५१
मूर्तिजापूर २९६४५
पातूर २४५४८
तेल्हारा २८५६१
.....................................
एकूण २२०८५६
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आयकरदाते शेतकरी व वेगवेळ्या कारणांमुळे अपात्र ठरलेल्या ८ हजार २६ शेतकऱ्यांकडून त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी