५ एप्रिल सोमवार रोजी मॉर्निंग वाॅकला जाणाऱ्या महिलांना एका अज्ञात वाहनाने चिरडले होते. यात उषा जयराम गिऱ्हे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. वर्षा वसानी, सचिन वसानी, सौ. वर्षा भुडके या महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. चालकाने वाहन सोनाळाच्या दिशेने पळविले. सोनाळा येथे पहाटे रस्त्यानजीक फिरणाऱ्या ६ युवकांपैकी सामाजिक कार्यकर्ते ललित सावळे आणि प्रशांत येटे यांना वाहनाने चिरडण्याचा प्रयत्न केला. टुनकी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाहन कैद झाले. वाहन भरधाव जाताना टुनकी येथील सीसी कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. येथील जागरूक नागरिकांनी माहिती व चित्रण हिवरखेड पोलिसांना दिले आहे. अपघातील आरोपी चालकाला शोधण्यात पोलीस उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
हिवरखेड येथील अपघातानंतर सोनाळा येथेसुद्धा वाहनाने उडविण्याचा प्रयत्न केला. परंतु सतर्क असल्यामुळे अपघात टळला. पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध कारवाई करावी.
-ललित सावळे, ग्रामपंचायत सदस्य, सोनाळा
सीसी कॅमेऱ्यातील चित्रण तपासले. हे वाहन सौंदळा रोडने गेले आहे. दानापूर येथे चौकशी केली. परंतु माहिती मिळाली नाही. पुढील तपासासाठी विशेष पथक नेमण्यात येईल.
-धीरज चव्हाण, ठाणेदार, हिवरखेड