नितीन गव्हाळेअकोला, दि. १७- काम करताना प्रत्येकालाच अडचणी येतात. तशा पोलिसांनाही अनंत अडचणींचा सामना करावा लागतो; परंतु पोलिसांना त्याविषयी बोलण्याची कुठे सोय नसते; मात्र आता पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना त्यांच्या समस्या, मागण्या वरिष्ठांसमोर मांडता येणार आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार पोलिसांसाठी समाधान हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. पोलिसांवर शहराची सुरक्षा व कायदा व्यवस्था सुरळीत पार पाडण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. पोलीसही एक माणूस आहे. त्यालाही मन असतं. पोलिसांना काम करताना, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सततचा बंदोबस्त, गुन्हय़ांचा तपास, आरोपींची धरपकड, व्हीआयपींची सुरक्षा आदी कामे पोलिसांना पार पाडावी लागतात. काम करताना, पोलिसांना कौटुंबिक समस्यांसोबतच, प्रशासकीय समस्यांचासुद्धा सामना करावा लागतो; परंतु पोलीस खात्यात वरिष्ठांकडे तक्रार करण्याची, समस्या मांडण्याची, पोलिसांना मुभा नसते आणि समस्या मांडल्याच तर वरिष्ठ अधिकारी त्या कानावर घेतीलच असेही कधी घडत नाही, त्यामुळे पोलिसांना नेहमीच गप्प राहावे लागते. या दृष्टिकोनातूनच राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्वच जिल्हास्तरावर पोलिसांना समस्या मांडण्यासाठी समाधान हेल्पलाइन सुरू करण्याचा आदेश नुकताच दिला आहे. त्यानुसार अकोला पोलीस दलाने पोलीस अधिकारी, कर्मचार्यांसाठी(0७२४-२४४५३0५) क्रमांकाची समाधान हेल्पलाइन सुरू केली आहे. पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना कोणतीही समस्या असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षकांना न भेटता, थेट हेल्पलाइनवर सकाळी १0 ते दुपारी ४ वाजेपर्यंंत संपर्क साधावा आणि आपल्या अडचणी मांडाव्यात, अशी व्यवस्था करण्यात आली. हेल्पलाइनसारखे माध्यम उपलब्ध करून दिल्यामुळे पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे. हेल्पलाइनवर या विषयांवर होईल समाधानपोलीस अधिकारी, कर्मचार्यांनी हेल्पलाइनवर संपर्क साधून हक्काची रजा, वेतन निश्चिती, वेतनवाढ, वेतन पडताळणी, नवृत्तीवेतन व इतर देय लाभ आणि शिट रिमार्क्स, बक्षीस, कसुरी, घरभाडे, पदोन्नतीची सद्यस्थिती, वेल्फेअर संबंधीचे काम, भविष्य निर्वाह निधीबाबतच्या अडचणी मांडाव्यात. या सर्व अडचणींची हेल्पलाइनवर नोंद घेण्यात येईल आणि अडचणींची पूर्तता झाल्यानंतर त्याची माहिती पोलिसांच्या भ्रमणध्वनीवर कळविण्यात येईल. पर्यटनासाठी मिळेल सुटी आणि पैसापोलिसांना महाराष्ट्र दर्शन किंवा महाराष्ट्राबाहेरील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी सुटी देण्यात येईल. त्यासंबंधीच पोलिसांनी हेल्पलाइनवर नोंद करावी. पर्यटनासाठी पोलिसांना काही रक्कमसुद्धा दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांना पर्यटनाला गेल्याची तिकिटे द्यावी लागणार आहेत. पोलिसांसाठी समाधान हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. पाच दिवसांमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचार्यांच्या अडचणींचे समाधान करण्यात येईल. ग्रामीण भागासोबतच शहरातील अधिकारी, कर्मचार्यांच्या सुविधेसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली. २0११ पासून हेल्पलाइन आहे; परंतु नव्याने हेल्पलाइनला समाधान हे नाव देण्यात आले आहे. चंद्रकिशोर मीणा, पोलीस अधीक्षक, अकोला
पोलीस अधिकारी, कर्मचा-यांच्या समस्यांचे समाधान आता हेल्पलाइनवर!
By admin | Published: November 18, 2016 2:53 AM