अडीच कोटींच्या नऊ वाहनांनी पोलिसांचे काम होणार आलिशान; DCM फडणवीस, पालकमंत्री विखे पाटलांकडून लोकार्पण
By नितिन गव्हाळे | Published: October 7, 2023 07:14 PM2023-10-07T19:14:10+5:302023-10-07T19:16:47+5:30
या वाहनांचे शनिवारी सकाळी शिवणी विमानतळाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.
अकोला: शासनाच्या गृह विभागाच्यावतीने अकोला पोलिस दलाला सुमारे अडीच कोटी रूपयांची आलिशान नऊ वाहने मिळाली आहेत. या वाहनांचे शनिवारी सकाळी शिवणी विमानतळाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.
पोलिस दलातील अनेक वाहने जुनी झाली होती. जिल्ह्यात व्हीआयपींचे होणारे दौरे लक्षात घेत, पोलिस दलाकडे दर्जेदार, सुविधायुक्त वाहने उपलब्ध नसायची. त्यानुसार पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी शासनाकडे नवीन वाहनांसाठी प्रस्ताव पाठविला होता. पोलिस दलाला नवीन वाहने खरेदी करण्यासाठी सुमारे अडीच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता. या निधीतून नवीन अत्याधुनिक नवीन वाहनांचा ताफा खरेदी करण्यात आला.
शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून वाहनांचे लोकार्पण केले. यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश पाटील भारसाकळे, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस मोटारवाहन विभागाचे प्रमुख पोलिस निरीक्षक प्रविण तायडे उपस्थित होते.
ही वाहने पोलिसांच्या ताफ्यात
चार स्कॉर्पिओ, एक सियाज, एक एक्सयुव्ही ७०० आणि ९ फोर्स ट्रॅव्हलर ही नवीन अडीच कोटी रूपयांची वाहने अकोला पोलिस दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. ही वाहने केवळ व्हीआयपी आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिमतीसाठी वापरण्यात येणार आहेत.