अकोला: जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे रविवारी अकोल्यात आले होते. त्यांनी अकोला पूर्व मतदारसंघातील काही गावांमधील पीक नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीला भाजपच्या आमदारांना बोलाविण्यात आले नसल्याचा आरोप भाजपने करीत, अपमान खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे. आता यावरून राजकारण पेटलं असून, पालकमंत्री बच्चू कडू व कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्यावर गलिच्छ राजकारण करीत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तसेच सत्तारुढ शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने लोकप्रतिनिधींचा अपमान करीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकांना भाजपच्या लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक डावलण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात पाटील यांनी केला आहे. इतर पक्षाच्या लोकप्रतिनिधींना मात्र, निमंत्रणे दिली जातात. कृषिमंत्री दादाजी भुसे व पालकमंत्री बच्चू कडू हे बैठकीपासून भाजप लोकप्रतिनिधींना दूर ठेवण्याचा प्रकार करीत असल्याचा आरोपही थोरात यांनी केला आहे. हा भाजपच्या लोकप्रतिनिधींचा अपमान नसून, जनतेचा अपमान आहे. त्यामुळे भाजप याला योग्यवेळी उत्तर देईलच. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बैठकीपासून दूर ठेवण्यामागे हेतू काय?
भाजपचे लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून जनतेला दिलासा देत असताना, त्यांना बैठकीत न बोलाविण्यामागे काय हेतू आहे. असा सवाल करून जिल्ह्यातील मतदारांचा अपमान सहन केला जाणार नाही. असा इशारा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात यांनी दिला आहे.
आढावा बैठक घेऊन काय साध्य केले?
कृषिमंत्री दादाजी भुसे अकोला दौऱ्यावर आले. अकोला पूर्व मतदारसंघातील काही गावांमधील शेती नुकसानीचा आढावा घेतला. त्यांच्याकडून भरघोस मदतीची अपेक्षा होती. परंतु आढावा बैठक घेऊन काय साध्य झाले. शेतकऱ्यांसाठी कोणती घोषणा केली. काय आश्वासने दिली? कोणत्या समस्यांचे निराकरण केले. आढावा बैठकीचा काय फायदा झाला. असा सवाल आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केला.
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची रविवारी बैठक घेतली. या बैठकीचे भाजप आमदारांना निमंत्रण देण्यात आले नाही. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या बाबतीतही तेच घडत आहे. भाजपचे आमदार अभ्यासपूर्ण मुद्दे उपस्थित करतात. त्याची उत्तरे त्यांच्याकडे नसतात. त्यामुळे जाणीवपूर्वक भाजपच्या आमदारांना बैठकीला बोलाविले जात नाही.
-रणधीर सावरकर आमदार व जिल्हाध्यक्ष भाजप
शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. घरे, अन्नधान्याचे नुकसान झाले. त्याकडे लक्ष देण्यापेक्षा सत्ताधारी पक्षाचे नेते पक्षभेद करीत आहेत. हे योग्य नाही. लोकप्रतिनिधी, महापौरांना बैठकीला बोलावून समस्या जाणून घ्यायला हव्या होत्या. परंतु दुदैवाने यात राजकारण होत आहे.
-विजय अग्रवाल, महानगराध्यक्ष भाजप