चार किलोमीटरच्या प्रवासासाठी वेळ वाया जात असून नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. वडगाव-वान येथील नागरिकांना कामानिमित्ताने दानापूर येथे यावे लागते. आर्थिक व्यवहारासह घरगुती वस्तू तसेच शेतीपयोगी साधन खरेदीसाठी नागरिकांना दानापूरला यावे लागते. रात्री-अपरात्रीचा प्रवास धोकादायक असल्यानंतरही याच मार्गाने नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यानंतरही बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. दररोज शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याच रस्त्याने नाईलाजास्तव प्रवास करण्याची वेळ संबंधित प्रशासनाने आणली आहे. अनेक वेळा सदर रस्त्याच्या कामासाठी लेखी तक्रारी करण्यात आल्या. मात्र प्रशासनाने याकडे कायम दुर्लक्ष केल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. सदर रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
फोटो:
नुकत्याच झालेल्या सभेमध्ये दानापूर-वडगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी पंधरा लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
-दीपमाला रवींद्र दामधर, जिल्हा परिषद सदस्य, दानापूर