वाडेगाव येथे अनेक वर्षांपासून शेतरस्त्यांची दयनीय अवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:15 AM2021-07-11T04:15:10+5:302021-07-11T04:15:10+5:30
वाडेगाव: येथील शेतशिवारातील शेतरस्ते अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत. शासनाच्या बदलत्या धोरणामुळे शेतरस्त्याच्या दुरुस्तीची कामे रखडल्याने शेतकऱ्यांना ...
वाडेगाव: येथील शेतशिवारातील शेतरस्ते अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ अवस्थेत आहेत. शासनाच्या बदलत्या धोरणामुळे शेतरस्त्याच्या दुरुस्तीची कामे रखडल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरेे जावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना चिखलमय रस्त्यातून वाट धरावी लागते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन शेतरस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
येथील बाळापूर मार्गावरील नारायण महाराज संस्थान ते सिंगर नाल्यापर्यंत अंदाजे ४ किलोमीटर अंतर असलेल्या शेतरस्त्याच्या दुरुस्ती बाबतीत तत्कालीन पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात संबंधित शेतकऱ्यांकडून निवेदन सादर करण्यात आले होते. रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात मंजुरीही मिळाली. रस्त्याची पाहणी करून इस्टिमेट वर्क ऑर्डर करून आदेश निघाल्याची माहिती आहे; परंतु शासनस्तरावरील बदलत्या धोरणामुळे शेतरस्त्याची स्थिती ‘जैसे थे’ आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांना ये-जा करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (फोटो)
शेतकऱ्यांसह वाहनचालकांना करावी लागते तारेवरची कसरत
शेतरस्त्यावर दगड व खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याने रस्त्यावरून ये-जा करताना शेतकऱ्यांसह वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना शेतमाल घरापर्यंत घेऊन येणे कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.
-------------------
शेतरस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. संबंधित विभागाकडून लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- प्रकाश पाटीलखेडे, शेतकरी वाडेगाव.