वाडी अदमपूर-तेल्हारा रस्त्याची दयनीय अवस्था !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:30+5:302021-06-20T04:14:30+5:30
वाडी अदमपूर : वाडी अदमपूर-तेल्हारा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ...
वाडी अदमपूर : वाडी अदमपूर-तेल्हारा रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्याची अपेक्षा होती; मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली असून, याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. वाडी अदमपूर-तेल्हारा हा सहा किलोमीटर अंतराचा रस्ता असून, वाडी अदमपूर गावापासून दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तीन-चार वर्षांपूर्वी केले होते. तेव्हापासून रस्त्याची डागडुजीही करण्यात आली नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. या मार्गावरून वाडी अदमपुर, जाफ्रापूर, इसापूर, उकळी बाजार, उकळी बु. वरुड वडनेर, वागंरगाव, बाभूळगाव, तळेगाव पा. आदी गावचे नागरिक तालुक्याच्या ठिकाणीय ये-जा करतात त्यामुळे मार्गावर मोठ्याप्रमाणात प्रमाणात वर्दळ सुरूच असते. (फोटो)
---------------------------------
रस्त्याची चाळणी, अपघाताची संख्या वाढली !
वाडी अदमपूर गावापासून दोन कि.मी. रस्त्याची वाट लागली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यात साचत असल्याने शेतकरी, व्यापारी, नागरिकांचा प्रवास खडतर झाला आहे. रस्त्यावर अपघाताची शक्यता वाढली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे तेल्हारा-वाडी अदमपूर, उकळी बाजार रस्त्याचे काम करण्यात आले; मात्र दोन किलोमीटर रस्त्याचे काम शिल्लक आहे. हा मार्ग एक वर्षापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
-----------------------------------------------------------
रस्त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्यास उपोषण करू.
-रूपेश राठी,
सरपंच, गट ग्रामपंचायत, वाडी अदमपूर
----------------------------------------------------------
गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे यामुळे वाहन चालविताना कसरत करावी लागते. संबंधित विभागाचे रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे.
-गोपाल भाकरे, ग्रामस्थ, वाडी अदमपूर