अकोला : कोरोनातून बरे झाल्यानंतरही वयोवृद्धांमध्ये फायब्रोसिसचा धोका कायम असतो, त्यामुळे अशा रुग्णांचा मृत्यूदेखील होऊ शकतो. अशीच घटना तीन दिवसांपूर्वी अकोल्यात घडली असून, अकोट येथील ६५ वर्षीय पोस्ट कोविड रुग्णाचा कोरोनामुळे बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या विशेषत: जे रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेऊन बरे झाले, अशा रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त कोविड रुग्ण बरे झाले आहेत. अकोलेकरांसाठी हा मोठा दिलासा असला, तरी कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. बरे झाल्यानंतरही अनेक रुग्णांना फुफ्फुसाशी निघडीत फायब्रोसीसची लक्षणे दिसून येत आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. अशीच एक घटना तीन दिवसांपूर्वी अकोल्यात घडली. अकोट येथील एका ६५ वर्षीय रुग्णाचा फायब्रोसीसमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. या रुग्णाला दुसऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यावरही धोका कायम असून, लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
यांनी घ्यावी विशेष काळजी
- आयसीयूमध्ये उपचार घेतलेले कोविड रुग्ण
- श्वास घेण्यास त्रास असल्याने ऑक्सिजनवर असलेले रुग्ण
- कोरोनातून बरे झालेले वयोवृद्ध रुग्ण
या लक्षणांवर द्या विशेष लक्ष
- चालताना थकवा येणे
- धाप लागणे
- अशक्तपणा जाणवणे
- श्वास घेताना त्रास होणे
- चक्कर येणे
- फुप्फुसात दाह होणे
ज्या रुग्णांना कोरोना होऊन गेला, अशा नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. विशेषत: ज्यांना तीव्र लक्षणे होती. आयसीयूमध्ये उपचार घेते, अशा रुग्णांना थकवा, श्वास घेण्यास त्रास यांसारखे लक्षणे आढळल्यास त्यांनी तत्काळ पोस्ट कोविड केंद्रामध्ये वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. अशा रुग्णांसाठी जीएमसीमध्ये पोस्ट कोविड सेंटर कार्यान्वित आहे.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला