अकोल्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:44 PM2018-02-01T13:44:32+5:302018-02-01T13:46:14+5:30
अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्या केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून महिनाभरातच फेरनियुक्त्या करण्यात आल्याने नाराज झालेल्या पक्षाच्या अकोला महानगर अध्यक्ष, युवा आघाडी महानगर अध्यक्षांसह पदाधिकारी व सदस्यांनी पक्ष सदस्यत्व व पदाचा राजीनामा देत असल्याचे बुधवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्या केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून महिनाभरातच फेरनियुक्त्या करण्यात आल्याने नाराज झालेल्या पक्षाच्या अकोला महानगर अध्यक्ष, युवा आघाडी महानगर अध्यक्षांसह पदाधिकारी व सदस्यांनी पक्ष सदस्यत्व व पदाचा राजीनामा देत असल्याचे बुधवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. सुहास साबे यांना अकोला जिल्हा युवक आघाडी प्रमुख पदावरून युवा आघाडी महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या समर्थनार्थ इतर पदाधिकाºयांनी राजीनामा देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आपल्यासोबत अडीचशेपेक्षा अधिक कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. राजीनामा संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना टपालद्वारे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षाची अकोला जिल्हा कार्यकारिणी २ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये सुहास साबे यांना जिल्हा युवक आघाडी प्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर महिनाभराच्या कालावधीत पक्षांतर्गत घडामोडी झाल्या. ३० जानेवारी रोजी संस्थापक अध्यक्ष आ. बच्चू कडू यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या पत्रात अकोला जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. यामध्ये सुहास साबे यांना जिल्हा युवक आघाडी प्रमुख पदाऐवजी अकोला युवा आघाडी महानगर अध्यक्ष करण्यात आले. यामुळे नाराज झालेल्या सुहास साबे यांनी पक्ष सदस्यत्व व पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या समर्थनार्थ महानगर अध्यक्ष प्रशांत भारसाकळ, महिला आघाडी महानगर अध्यक्ष नम्रता ठोकळ, विद्यार्थी आघाडी महानगर अध्यक्ष शुभम पिठलोड यांच्यासह ज्ञानेश्वर देशमुख, अमोल खोबरखेडे, शुभम गावंडे, बाळू पाटील ढोले, शुभम लहामगे, विक्की कांबे, संदीप तवर, श्रीकांत नकासकर, सविता शेळके, नंदु सारसार, उज्ज्वल तायडे व मो.अतिम यांनी बुधवारी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. वैयक्तिकरीत्या बच्चू कडू यांच्याशी सदैव जुळलेले राहणार असल्याचे यावेळी राजीनामा देणाºयांनी सांगितले.
‘झुंज’ संघटनेचे पुनरुज्जीवन करणार
प्रहार जनशक्ती पक्षात सामील होण्यापूर्वी आम्ही ‘झुंज’ या सामाजिक संघटनेद्वारे समाजकार्य करत होतो. आता प्रहारचा राजीनामा दिल्यानंतर आम्ही पूर्वीप्रमाणे ‘झुंज’या संघटनेच्या छताखाली एकत्र येऊन समाजकार्य करतच राहू, असे सुहास साबे, प्रशांत भारसाकळ व इतर कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. ‘झुंज’ संघटनेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.