अकोला जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 08:25 PM2021-05-30T20:25:08+5:302021-05-30T20:27:21+5:30
अकोला : जिल्ह्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने रविवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे ...
अकोला : जिल्ह्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने रविवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी पत्रेही उडाली असून, ग्रामीण भागात लिंबू, केळीसह फळबागांचे नुकसान झाले. शहरातील मलकापूर, कौलखेड परिसराला गारांचा तडाखा बसला.
काही दिवसांआधी तौक्ते वादळाच्या तडाख्याने शहरात व ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर यास वादळाने आणखी धडकी भरविली; परंतु या वादळाचा फारसा परिणाम जिल्ह्यात जाणवला नाही. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार-पाच दिवस वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला होता. शनिवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर रविवारी अकोला शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तब्बल ४५ मिनिटे झालेल्या पावसाने शहरातील काही भागात झाडे उन्मळून पडली, तर मलकापूर व कौलखेड परिसरात गारांसह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी घरांवरील पत्रेही उडाले होते. पावसाने ग्रामीण भागातही हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे.