निवडणूक प्रक्रिया राबविताना लसीकरण, चाचण्यांना प्राधान्य द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:15 AM2021-06-25T04:15:24+5:302021-06-25T04:15:24+5:30
अकोला : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया राबविताना कोरोना विषयक नियमांचे पालन करणे ...
अकोला : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया राबविताना कोरोना विषयक नियमांचे पालन करणे आवश्यक असून, निवडणुकीशी संबंधित कर्मचारी, अधिकारी व उमेदवारांचे आवश्यकतेनुसार लसीकरण आणि कोविड चाचण्या करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी दिले.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त सूचनांचे वाचन केले व सर्वांना अवगत केले. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर कोविडची खबरदारी घेणे व त्याची माहिती संबंधितांना देणे आवश्यक आहे. यावेळी जिल्ह्यातील पोटनिवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदेचे गट आणि पंंचायत समित्यांचे गण तसेच तेथील मतदान केंद्रांची स्थिती, मतदान यंत्रे, निवडणुकीचे वेळापत्रक, राज्य निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश याबाबत माहिती देऊन चर्चा करण्यात आली.
या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांच्यासह जिल्हयातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.