खासगी डॉक्टरचा नोंदविला जबाब
By admin | Published: February 16, 2016 01:38 AM2016-02-16T01:38:15+5:302016-02-16T01:38:15+5:30
युवकाच्या डोक्यात सुई ठेवल्याचे प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकाद्वारे सुनावनी सुरू.
अकोला: रस्ते अपघातात जखमी झालेल्या युवकाच्या डोक्यावर टाके मारताना, बार्शिटाकळी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी डोक्यात सुई ठेवल्याने, युवकाची प्रकृती गंभीर झाल्याचा संतापजनक प्रकार ३0 जानेवारी रोजी बाश्रीटाकळी ग्रामीण रुग्णालयात घडला होता. या प्रकरणाची चौकशी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामचंद्र गिरी यांनी सुरू केली आहे. त्यांनी युवकाच्या डोक्यातुन सुई काढणार्या खासगी डॉक्टरचा सोमवारी जबाब नोंदविला आहे. याप्रकरणी दोषी वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. बाश्रीटाकळी शहरातील अकोली वेसजवळ राहणारा अब्दुल साकीब अब्दुल शब्बीर (२२) याचा २८ जानेवारी रोजी रात्री कान्हेरी-शिवापूर मार्गावर अपघात झाला होता. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याला बाश्रीटाकळी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याच्या डोक्यावरील जखमेवर आठ टाके मारले आणि अब्दुल साकीबला घरी पाठवून दिले; परंतु दुसर्या दिवसापासून युवकाचे डोके दुखायला लागले. त्यामुळे साकीबला बाश्रीटाकळी ग्रामीण रुग्णालयात भरती केले; परंतु येथील वैद्यकीय अधिकार्यांनी रुग्णालयात उपचार करणे शक्य नसल्याचे सांगितल्याने साकीबला अकोल्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. टाके मारताना डोक्यामध्ये सुई राहिल्याने, डोक्याला सूज आली होती. खासगी रुग्णालयात तपासणी केल्यावर साकीबच्या डोक्यातील सुई काढण्यात आल्यानंतर साकीबच्या नातेवाइकांनी बाश्रीटाकळी ग्रामीण रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला होता. त्यानंतर या प्रकरणाची आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यावर त्यांनी डोक्यातील सुई प्रकरणाची चौकशी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गिरी यांच्याकडे दिली होती. डॉ. गिरी यांनी बार्शिटाकळी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नेमाडे यांचा जबाब नोंदविला. तसेच वार्डबॉयचा सुद्धा जबाब नोंदविण्यात आला.