अकोला : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गत १० डिसेंबरला प्रलंबित ठेवण्यात आलेल्या बाळापूर व अकोला तालुक्यातील ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या ठरावास मंजुरी प्रदान करत, वेळेवरच्या विषयात मंजूर करण्यात आलेल्या विविध १८ ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई करण्यात येत असल्याचा आदेश अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी १० फेब्रुवारीला दिला.
गत १० डिसेंबरला जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ‘व्हिडिओ काॅन्फरन्सिंग’द्वारे घेण्यात आली. या सभेत विषयपत्रिकेवरील बाळापूर व अकोला तालुक्यातील ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी सर्वेक्षण , संकल्पन, अंदाजपत्रक तयार करणे व योजनेचे कार्यान्वयन महाराष्ट्र जीवन प्राधीकरणामार्फत करण्याचा ठराव प्रलंबित ठेवण्यास आला होता तसेच वेळेवरच्या विषयात विविध १८ ठराव मंजूर करण्यात आले होते. ६९ गावे पाणीपुरवठा योजनेचा ठराव प्रलंबित ठेवल्याने तसेच वेळेवरच्या विषयांत मंजूर करण्यात आलेल्या १८ ठरावांविरुद्ध अमरावती विभागीय आयुक्तांकडे धाव घेत जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेता गोपाल दातकर व मोहन ऊर्फ अप्पू तिडके यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. या अपीलवर ९ फेब्रुवारी अंतिम सुनावणी झाल्यानंतर बाळापूर व अकोला तालुक्यातील ६९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या ठरावास मंजुरी प्रदान करत, वेळेवरच्या विषयांत मंजूर करण्यात आलेल्या १८ ठरावांची अंमलबजावणी करण्यास मनाई करण्यात येत असल्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी १० फेब्रुवारीला दिला. संबंधित १८ ठराव जिल्हा परिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेच्या विषय सूचीवर घेण्याचेही विभागीय आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.