लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने जिल्ह्यातील राजकीय वातावरणात ऊब निर्माण केली आहे. एकमेकांना धोबीपछाड देण्यासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून विविध डावपेच खेळल्या जात आहेत. यादरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांना शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जाहीर प्रचार करण्याची मुभा आहे. त्यानंतर प्रचारतोफा थंडावणार आहेत. जाहीर प्रचार, कॉर्नर बैठकांना आपसुकच लगाम लागणार असला तरी उमेदवारांना मतदारांच्या गृहभेटी घेता येतील. यामुळे शनिवारी रात्री आणि रविवारी संपूर्ण दिवस मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी उमेदवारांचा चांगलाच कस लागणार असल्याचे चित्र आहे.विधानसभेच्या आखाड्यात भाजप-शिवसेना महायुती, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी आणि वंचित बहुजन महासंघाने दिग्गज उमेदवारांना उतरवले आहे. बाळापूर विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाटेला गेल्यामुळे भाजपने उर्वरित चारही मतदार संघात विद्यमान आमदारांना संधी दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने यंदा प्रथमच बाळापूर मतदार संघातून दंड थोपटत मूर्तिजापूर मतदार संघातही शड्डू ठोकले आहेत. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघापैकी तीन मतदारसंघात काँग्रेस व दोन मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतिस्पर्ध्यांना लोळवण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र आहे. महायुती असो वा महाआघाडीच्या उमेदवारांसमोर वंचित बहुजन आघाडीने कडवे आव्हान निर्माण केले आहे. वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर राजकीय सारीपाटावर मोठा फेरबदल घडवण्यास हातभार लावेल,असे तूर्तास दिसत आहे. एकूणच जिल्ह्यातील राजकीय वातावरण पाहता सर्वसामान्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
शक्तिप्रदर्शनावर भर!निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शनिवारी सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार संपणार असल्यामुळे शेवटच्या टप्प्यात उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी ठिकठिकाणी रॅली काढून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल.