आंतरजिल्हा बदल्यांतील २१ शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:34 AM2020-08-14T10:34:25+5:302020-08-14T10:34:34+5:30
प्रस्तावाची फाइल गुरुवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) पाठविण्यात आली आहे.
अकोला : आंतरजिल्हा बदल्या करण्यात आलेल्या जिल्ह्यातील २४ प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात आला असून, प्रस्तावाची फाइल गुरुवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) पाठविण्यात आली आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील विविध जिल्हा परिषदांतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या ११ आॅगस्ट रोजी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील २१ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमधून २८ प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा बदलीने अकोला जिल्ह्यात आले आहेत. आंतरजिल्हा बदल्या करण्यात आलेल्या २१ शिक्षकांना संबंधित जिल्ह्यांत (बदलीच्या ठिकाणी) रुजू होण्याकरिता जिल्हा परिषदमार्फत संबंधित २१ प्राथमिक शिक्षकांना अकोला जिल्ह्यातून कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यासाठी या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात आला असून, प्रस्तावाची फाइल शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १३ आॅगस्ट रोजी सादर करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून मान्यता प्राप्त झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली करण्यात आलेल्या २१ प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे.
माध्यमनिहाय असे कार्यमुक्त होणार शिक्षक!
मराठी माध्यमाच्या १९ आणि उर्दू माध्यमाच्या २ प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. त्यानुसार मराठी माध्यमाचे १९ आणि उर्दू माध्यमाच्या २ शिक्षकांना जिल्हा परिषदमार्फत कार्यमुक्त करण्यात येणार आहे.