रस्त्याची चाळण! ‘वंचित’चा रास्ता रोको; न्यू तापडीया नगरातील रेल्वे गेटजवळ आंदोलन
By संतोष येलकर | Published: October 22, 2022 05:56 PM2022-10-22T17:56:27+5:302022-10-22T17:56:35+5:30
महानगरपालिका हद्दीतील न्यू तापडीया नगर भागातील रेल्वे गेटपासून खरपपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे.
अकोला - शहरातील न्यू तापडीया नगरातील रेल्वे गेटपासून खरपपर्यतच्या भागातील खड्डेमय झालेल्या रस्त्याची चाळण झाली असल्याने, वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अकोला शहर पूर्व शाखेच्यावतीने शनिवारी रेल्वे गेटजवळ ‘रास्ता रोको’आंदोलन करण्यात आले.
महानगरपालिका हद्दीतील न्यू तापडीया नगर भागातील रेल्वे गेटपासून खरपपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून खड्डेमय झालेल्या रस्त्यावर वाहन चालविणे कठिण झाले असून, खड्डे पाहून वाट काढताना वाहनधारकांना कमालीची कसरत करावी लागत आहे. रस्त्याची वाट लागल्याने, या रस्त्यावर अनेकदा अपघाताचे प्रसंगदेखील घडत असतात. या संदर्भात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रार करुनही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे रस्ता समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अकोला शहर पूर्व शाखेच्यावतीने शहरातील न्यू तापडीया नगर भागातील रेल्वे गेटजवळ ‘रास्ता रोको ’ आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात वंचित बहुजन आघाडी अकोला शहर पूर्व शाखेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य शंकरराव इंगळे यांच्यासह मनोहर बनसोड, माणिक शेळके, सुगत तायडे, सचिन गोरले, अमोल सिरसाट, आशिष, दिनेश जगदाळे, शैलेश देव, साजन अबगड, सुमीत ठाकरे, सुरेश कलोरे, नंदू इंगळे, पुरुषोत्तम वानखडे, अंकुश तायडे, सुशिल ठाकरे, अजय मस्के, अजय डाबेराव, संजय वानखडे, अशोक जाधव, रमेश प्रधान, किसन वाघमारे, आनंद इंगळे, मिलींद बनसोड, दिलीप सिरसाट आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
... तर तीव्र आंदोलनाचा इशारा
रस्ता समस्येची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारादेखील वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रास्ता रोको आंदोलनादरम्यान देण्यात आला.