फटाके फोडणाऱ्या ५० बुलेटवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:32 AM2021-02-06T04:32:38+5:302021-02-06T04:32:38+5:30
अकोला : शहरासह जिल्ह्यात भरधाव वेगात बुलेट चालवून बुलेटच्या सायलेन्सरद्वारे फटाके फोडणाऱ्या दुचाकी चालकांवर वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम ...
अकोला : शहरासह जिल्ह्यात भरधाव वेगात बुलेट चालवून बुलेटच्या सायलेन्सरद्वारे फटाके फोडणाऱ्या दुचाकी चालकांवर वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेनुसार गत काही दिवसांमध्ये ५० बुलेटचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच फॅन्सी नंबरप्लेट, सायलेन्सर बदलून देणाऱ्यांनाही वाहतूक शाखेने नोटिसा बजावल्या आहेत.
बुलेट दुचाकीच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून फटाके फोडणारे व मोठा आवाज करणारे सायलेन्सर लावून भरधाव वेगाने बुलेट चालविणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी उगारला. त्यानुसार धडक मोहीम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ५० बुलेट वाहतूक कार्यालयात लावून सदर बुलेटला लावलेले डुप्लिकेट सायलेन्सर जे इंदोरी, पंजाबी, डबल पंजाबी अशा नावाने ओळखले जातात, असे सायलेन्सर काढून मूळ सायलेन्सर लावल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर दंडात्मक कारवाई करून बुलेट सोडण्यात आल्या. मोहिमेदरम्यान वाहतूक शाखेला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला; परंतु शहर वाहतूक शाखेने कोणाचीही तमा न बाळगता ही मोहीम राबवून जवळपास ५० बुलेटवर दंडात्मक कारवाई केली. ह्या मोहिमेच्या धसक्याने बऱ्याच बुलेटचालकांनी दुचाकींचे डुप्लिकेट सायलेन्सर बदलून ओरिजिनल सायलेन्सर लावले; त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी ५ फेब्रुवारी रोजी शहरातील फॅन्सी नंबर प्लेट बनविणारे, डुप्लिकेट सायलेन्सर लावून देणारे कारागीर यांची वाहतूक कार्यालयात बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये फॅन्सी नंबरप्लेट व डुप्लिकेट सायलेन्सर बदलून देता कामा नये, अशी तंबी दिली. त्यांना लेखी नोटीससुद्धा देण्यात आली. डुप्लिकेट सायलेन्सर लावून फटाके फोडत बुलेट चालविणाऱ्यांना चाप लावण्यासाठी ही मोहीम पोलीस अधीक्षक जी. श्रीधर ह्यांच्या मार्गदर्शनात सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले.