जिल्हा परिषदांमध्ये रखडली होमियोपॅथिक औषधीची खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 11:06 AM2020-09-12T11:06:42+5:302020-09-12T11:06:59+5:30
दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये होमियोपॅथिक औषधीची खरेदी प्रक्रिया रखडली आहे.
- संतोष येलकर
अकोला : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर ग्रामीण भागात अर्सेनिक अल्बम -३० या होमियोपॅथिक औषधीचा पुरवठा करण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगांतर्गत निधीतील व्याजाच्या रकमेतून होमियोपॅथिक औषधीची खरेदी करण्याचे निर्देश ७ जुलै रोजी शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांना पत्राद्वारे देण्यात आले होते; मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये होमियोपॅथिक औषधीची खरेदी प्रक्रिया रखडली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता घेता, राज्यात ग्रामीण भागातील जनतेला अर्सेनिक अल्बम-३० या होमियोपॅथिक औषधीचा पुरवठा करण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगांतर्गत निधीच्या व्याजाच्या रक्कमेतून होमियोपॅथिक औषधीची खरेदी करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने ७ जुलै रोजीच्या पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना निर्देश दिले होते. शासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशानंतर दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांकडून होमियोपॅथिक औषधीची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. औषधीची खरेदी प्रक्रिया जिल्हा परिषदांमध्ये रखडली असल्याने, कोरोना काळात ग्रामीण भागातील जनतेला होमियोपॅथिक औषधीचा पुरवठा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शासनाकडून मागविण्यात आली माहिती!
जिल्हा परिषदांकडून होमियोपॅथिक औषधी खरेदी करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आल्याने शासनाच्या ग्रामविकास विभागाने २९ जुलै रोजीच्या पत्रानुसार यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांकडून माहिती मागविण्यात आली. त्यामध्ये औषधी खरेदीसाठी निविदेची जाहिरात केव्हा प्रसिद्ध करण्यात आली, औषध खरेदीसाठी किती निविदा प्राप्त झाल्या, निविदा केव्हा उघडण्यात आल्या, औषधीचे किमान व कमाल दर काय आले, औषध खरेदीचे आदेश निविदाधारकास कोणत्या दाराने व केव्हा देण्यात आले, औषध खरेदी करून वाटप करण्यात आले काय आणि औषध अद्यापही खरेदी करण्यात आले नसल्यास त्याची कारणे काय, इत्यादी मुद्यांची माहिती सादर करण्याचे निर्देशही शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत.
होमियोपॅथिक औषधी खरेदीची प्रक्रिया जिल्हा परिषदमार्फत अद्याप सुरू करण्यात आली नाही. औषधीच्या खरेदीसंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
- सौरभ कटियार
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.