रेल्वेचा लाचखोर अभियंता सीबीआयच्या जाळ्यात
By admin | Published: April 27, 2017 01:28 AM2017-04-27T01:28:19+5:302017-04-27T01:28:19+5:30
अकोला : मध्य रेल्वेच्या अकोला येथील सहायक मंडळ कार्यालयातील रेल्वे अभियंत्यास १० हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने रंगेहात अटक केली.
अकोला : मध्य रेल्वेच्या अकोला येथील सहायक मंडळ कार्यालयातील रेल्वे अभियंत्यास १० हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने रंगेहात अटक केली. सदर लाचखोर अभियंत्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अकोला क्रिकेट क्लब मैदानासमोर दक्षिण व मध्य रेल्वेचे संयुक्त कार्यालय आहे. या कार्यालयात रेल्वेचा सहायक मंडळ कार्यालय अभियंता संतोष महादेव पोहरकर याने गँगमनला बदली करून देण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती. एवढेच नव्हे, तर त्याने गँगमनकडून बदलीसाठी यापूर्वी २० हजार रुपयांच्यावर पैसेही दिले होते; मात्र त्यानंतरही बदली होत नसल्याने या प्रकरणाची तक्रार गँगमनने नागपूर येथील गुन्हे अन्वेषण विभागाकडे केली. यावरून गुन्हे अन्वेषण विभागाने पडताळणी करून सहायक अभियंता संतोष पोहरकर याला १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. त्यानंतर सदर लाचखोर अभियंत्यास न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गँगमनला मूर्तिजापूर ते चांदुर रेल्वे या मार्गावर बदली हवी होती आणि त्यासाठी त्याने रेल्वेचा सहायक मंडळ कार्यालय अभियंता संतोष महादेव पोहरकर याला लाच दिली होती.