अकोला : पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले आहेत; परंतु अद्यापही सर्वदूर पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मागील तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
ग्रामीण भागातील बस बंद
अकोला : एसटी महामंडळाकडून लांब पल्ल्याच्या बस सोडण्यात येत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील बस बंद असल्याने खेड्यापाड्यातील प्रवाशांना अडचणी येत आहेत. काही दिवसांपासून बसस्थानकावर प्रवासी संख्याही वाढली आहे.
दिवसभर उकाडा
अकोला : गेल्या आठवड्याचा विचार करता सायंकाळपर्यंत आकाशात ढग गर्दी करतात. सायंकाळी काही सरी येतात व गारवा सुटतो. तुरळक ठिकाणी एखादी हलकी सर येऊन जाते आणि ढग पांगून जातात, असेच काहीसे चित्र सध्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान, दिवसभर प्रचंड उकाडा जाणवतो.
आठवडी बाजार बंदचा फटका
अकोला : खरीप हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी शेतातील भाजीपाला पीक व जवळ असलेला उरलासुरला शेतमाल विक्रीची घाई करीत आहे; परंतु आठवडी बाजार बंद असल्याने शेतमालाला दर मिळत नाही.
स्कूल बसचालक अडचणीत
अकोला : कोरोनाचा सर्वाधिक फटका हा स्कूल बसचालक, मालकांना बसला आहे. गेल्या १६ महिन्यांपासून स्कूल बसची चाके एका जागेवरच असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही चालकांना भाजीपाला विकावा लागत आहे, तर काही चालकांना शेती, मोलमजुरीची कामे करण्याची वेळ आली आहे.
रेशन दुकानांमध्ये गर्दी वाढली!
अकोला : अंत्योदय, प्राधान्य, तसेच पंतप्रधान गरीब कुटुंब कल्याण योजनेंतर्गत सामान्य नागरिकांना रेशनचे धान्य देणे सुरू केल्याने ग्रामीण, तसेच शहरी भागातील रेशन दुकानांमध्ये गर्दी वाढली आहे.
कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे!
अकोला : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत आहे. यातील काहींना शासनाने विमा लागू केला आहे. त्याच धर्तीवर सरपंच, सदस्यांनाही विमा कवच लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात काही ग्रामपंचायतींनी निवेदनही दिले आहे.
कोरोनामुळे कर्ज माफ करण्याची मागणी
अकोला : दारिद्र्यरेषेखालील नागरिक आणि विविध योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेतून व्यवसायासाठी घेतलेले कर्ज भरणे आता कठीण होत आहे. त्यामुळे अशा नागरिकांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी होत आहे.
किराणा दुकानांमधील गर्दी ओसरली!
अकोला : कडक निर्बंध असताना किराणा विक्रीला मुभा देण्यात आली होती. यावेळी बहुतांश नागरिक किराणा खरेदीसाठी गर्दी करीत होते. आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर किराणा दुकानातील गर्दी ओसरली आहे.