‘रॅपिड टेस्ट’; रुग्णांच्या संख्येवरून मनपाच्या आरोग्य यंत्रणेचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 10:26 AM2020-08-01T10:26:34+5:302020-08-01T10:26:57+5:30
शुक्रवारी चाचणी केलेल्या रुग्णांच्या संख्येवरून मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेचा गोंधळ उडाल्याचे समोर आले.
अकोला : शहरातील वयोवृद्ध नागरिक तसेच दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत असल्यास त्यांच्यासाठी मनपा प्रशासनाने भरतीया रुग्णालयात ‘रॅपिड टेस्ट’ला प्रारंभ केला. शुक्रवारी चाचणी केलेल्या रुग्णांच्या संख्येवरून मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेचा गोंधळ उडाल्याचे समोर आले. सायंकाळी उशिरा या विभागाने सावरासावर करीत रुग्णसंख्या निश्चित केली. यावेळी एकूण ४६ संशयितांची तपासणी केली असता यामध्ये आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचे लोण मोठ्या प्रमाणात पसरल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. यादरम्यान, मागील काही दिवसांपासून शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घसरण होत असल्याचे मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, ही बाब अकोलेकरांसाठी दिलासादायक मानली जात आहे. तरीसुद्धा या विषाणूला पूर्णपणे आळा घालण्याच्या उद्देशातून मनपा प्रशासनाने भरतीया रुग्णालयात वयोवृद्ध नागरिक तसेच दुर्धर आजारी असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यासाठी ‘रॅपिड टेस्ट’ला प्रारंभ केला. या ठिकाणी मनपाची वैद्यकीय आरोग्य यंत्रणा तसेच निमा व जीपीए डॉक्टर संघटनांच्या माध्यमातून चाचणीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.
आकडेवारीवरून संभ्रम; सायंकाळी केली दुरुस्ती
मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेकडून सुरुवातीला ५६ संशयित रुग्णांची तपासणी केल्याचे कळविण्यात आले. त्यानंतर मात्र चूक लक्षात येताच सायंकाळी उशिरा तातडीने दुरुस्ती करण्यात आली. यावेळी ४६ रुग्णांपैकी आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे स्पष्ट केले.