बाटलीबंद ज्युस व शीतपेयांमधील घटकांचे प्रमाण ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 06:38 PM2019-05-15T18:38:16+5:302019-05-15T18:38:32+5:30
शीतपेय तयार करताना त्यात उपयोगात आणल्या जाणाऱ्या घटकांचे प्रमाण आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणांतर्गत ठरवून देण्यात येणार.
अकोला: शीतपेय तयार करताना त्यात विविध घटकांचे प्रमाण किती असावे, या संदर्भात आतापर्यंत कुठलाच नियम नव्हता; परंतु यापुढे शीतपेय तयार करताना त्यात उपयोगात आणल्या जाणाऱ्या घटकांचे प्रमाण आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणांतर्गत ठरवून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एफएसएसएआयच्या नवीन नियमावलीचे उल्लंघन केल्यास उत्पादकांवर कठोर कारवाई
बाजारपेठेत विक्री होणाºया कुठल्याच शरबत, फळांचा रस तसेच इतर शीतपेयांमध्ये वापरण्यात येणाºया घटकांबद्दल आणि त्यांच्या प्रमाणाबद्दल कुठलेच नियम नव्हते. त्यामुळे उत्पादकांवर कुठलेच निर्बंधही नव्हते; परंतु आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने पुढाकार घेत शीतपेय आणि ज्युस यामध्ये फळांचा रस आणि इतर घटकांचे प्रमाण किती असावे, याची नियमावली तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, एफएसएसएआयच्या नवीन नियमानुसार फळांचा रस, पाणी, सॉलिड, सायट्रिक अॅसिड यांचे प्रमाण ठरवण्यात आले आहे. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने फळांचा रस आणि अन्य घटक किती असावेत, याचे प्रमाण ठरवून दिले आहे. या संदर्भात प्राधिकरणाकडून नोटिफिकेशनदेखील काढण्यात आले आहे. त्यानुसार, तज्ज्ञांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. या सूचनांचा विचार करून अंतिम मसुदा तयार केला जाणार आहे. त्यानंतरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
असे असेल प्रमाण
शीतपेयांमध्ये फळांच्या रसासोबतच सायट्रिक अॅसिड व इतर घटकांचा समावेश असतो. एफएसएसएआयच्या नवीन नियमानुसार, शीतपेयांमध्ये फळांच्या रसाचे प्रमाण २५ टक्के, तर सायट्रिक अॅसिडचे प्रमाण ३.५ टक्के असणे आवश्यक आहे. या शिवाय, इतर घटकांचे प्रमाण हे शीतपेयानुसार बदलण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने फळांचा रस आणि सायट्रिक अॅसिडचे प्रमाण सारखेच ठेवण्यात आले आहे.
या निर्णयामुळे आता शीतपेय तयार करताना उत्पादकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. उत्पादकांनी या नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) द्वारे कारवाई केली जाईल.
- नितीन ताथोड, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, अकोला