अकोला : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या अभिलेख्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. सातही पंचायत समित्यांमध्ये २६ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान या पथकांकडून आढावा घेतला जाणार आहे. त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणीची विशेष मोहीम यापूर्वी आॅक्टोबरमध्ये राबविण्यात आली. त्यामध्ये ग्रामपंचायतींचे अभिलेखे नमुना १ ते ३३ ची तपासणी करण्यात आली. दप्तर तपासणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता सरपंच आणि सरपंचांकडून ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आल्या. तसेच ग्रामसभेत ग्रामपंचायतींच्या दप्तराचे वाचन करण्यात आले. ग्रामस्थांना ग्रामपंचायत दप्तराची पाहणी करण्यासाठीही उपलब्ध ठेवण्यात आले. आता पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे यांच्या पथकाकडे ही जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक पंचायत समितीमध्ये जाऊन ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांकडून माहिती घेत तपासणी करावी, असेही आदेशात म्हटले. त्याशिवाय, ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र, प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पाणीपट्टी वसुली, भारत निर्माण, महाजल, राष्ट्रीय पेयजल योजनेच्या प्रलंबित कामांचा आढावा तसेच २००२ ते २०१८ पर्यंत दलित वस्ती विकास योजनेतील अपूर्ण कामांचा आढावाही घेतला जाणार आहे. त्यासाठी पंचायत समितीनिहाय वेळापत्रक देण्यात आले. त्यानुसार बाळापूर पंचायत समिती २६ डिसेंबर रोजी, पातूर-२७, बार्शीटाकळी-३०, अकोट-३१, तेल्हारा-२ जानेवारी, मूर्तिजापूर-४ जानेवारी, अकोला-७ जानेवारी रोजी तपासणी केली जाणार आहे.
- स्वच्छ अंगणवाडीसाठी दोन प्रस्तावस्वच्छ व सुंदर अंगणवाडी स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड समितीच्या सभेत दोन अंगणवाड्या पात्र ठरल्या आहेत. त्या दोन्ही अंगणवाड्यांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पातूर तालुक्यातील पिंपरडोळी क्रमांक-२, अकोट तालुक्यातील जऊळका येथील अंगणवाडीचा समावेश आहे.