तेलबिया उत्पादन, विक्री प्रकल्पास ‘महाज्योती’ची मान्यता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:24 AM2021-09-08T04:24:35+5:302021-09-08T04:24:35+5:30
संतोष येलकर अकोला : प्रायोगिक तत्त्वावर तेलबिया उत्पादन, प्रक्रिया व विक्री प्रकल्पास शासनाच्या महात्मा जोतिबा फुले संशोधन व ...
संतोष येलकर
अकोला : प्रायोगिक तत्त्वावर तेलबिया उत्पादन, प्रक्रिया व विक्री प्रकल्पास शासनाच्या महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) संचालक मंडळाने २८ ऑगस्ट रोजी दिली असून, त्यामध्ये अकोला व अमरावती या दोन जिल्ह्यांत प्रत्येकी पाच हजार एकर क्षेत्रावर ‘करडई’ लागवडीचा प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या रब्बी हंगामात दोन्ही जिल्ह्यात ‘करडई’ लागवडीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) संचालक मंडळाच्या नागपूर येथील बैठकीत गत २८ ऑगस्ट रोजी प्रायोगिक तत्त्वावर तेलबिया उत्पादन, प्रक्रिया व विक्री प्रकल्पास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत येत्या खरी हंगामात अकोला व अमरावती या दोन जिल्ह्यांत प्रत्येकी पाच हजार एकर क्षेत्रावर करडई या तेलबिया वर्गीय पीक लागवडीचा प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामात अकोला व अमरावती या दोन्ही जिल्ह्यांत कृषी विभागामार्फत करडई लागवडीचा प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
उत्पादनाची आधारभूत किंमत
दराने करणार खरेदी !
‘महाज्योती’मार्फत राबविण्यात येणाऱ्या तेलबिया उत्पादन व विक्री प्रकल्पांतर्गत करडई लागवडीच्या प्रकल्पात शेतकऱ्यांनी तयार केलेल्या करडई उत्पादनाची आधारभूत किंमत दराने खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती अमरावती विभागीय कृषी सहसंचालकांनी दिली.
.............................................
यासाठी राबविला जात आहे
करडई लागवडीचा प्रकल्प !
आरोग्याच्या दृष्टीने करडई तेलाचा वापर वाढावा, पीक पेऱ्यांत फेरबदल व्हावा, पिकाचे नुकसान टाळून उत्पादन वाढावे, यासाठी यंदाच्या खरीप हंगामात अकोला व अमरावती या दोन जिल्ह्यात प्रत्येकी पाच हजार एकर क्षेत्रावर करडई लागवडीचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. असे अमरावती विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी सांगितले. या प्रकल्पात शेतकरी गट आणि बचत गटांना करडई तेलघाणीचा प्रकल्प सुरू करण्यास मान्यता देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.