अकोला: ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला देण्यात आला. त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, त्यातील समित्यांकडून ती रक्कम मार्च २०१९ अखेर वसूल करण्याचा अल्टिमेटम जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला शासनाकडून जून २०१८ मध्ये देण्यात आला आहे. त्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे फलित म्हणून आतापर्यंत १०१ पैकी केवळ सहा योजनांचा हिशेब पूर्ण होऊन वसुलीसह इतर कार्यवाही सुरू झाल्याची माहिती आहे.ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजनांचे नियोजन, अंमलबजावणी, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडे सोपविण्यात आली. समितीने केलेल्या कामात कोट्यवधींच्या अपहाराचीच प्रकरणे पुढे आली. त्यामुळे समितीचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. ठरलेल्या काळात पूर्ण न झालेल्या तसेच तीन वर्षांपासून प्रलंबित योजना शिल्लक निधीसह जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील शाखा अभियंत्यांना योजनेचे काम तपासण्याचे उद्दिष्ट दिले. अपूर्ण कामांचे मूल्यांकन करून उर्वरित निधी जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर देण्यात आली. त्याचा आढावा दर पंधरवड्यात घेण्याचेही निर्देश देण्यात आले. त्याचवेळी शासनानेही जून २०१८ मध्ये याबाबतचा आढावा घेतला. त्यामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये असलेल्या योजनांची कामे, अपूर्ण कामे, खर्च, शिल्लक निधी, वसूलपात्र रकमेचा शोध घेऊन तातडीने योजना हस्तांतरण करण्याचे निर्देश देण्यात आले, तर अपहारित रकमेची वसुली ३१ मार्च २०१९ पर्यंत करण्याचेही बजावण्यात आले. पेयजल योजनेच्या जिल्ह्यातील ७२ पैकी ६९ योजना अद्याप अपूर्ण आहेत. त्यासाठी २५ कोटी ६ लाख ७३ हजारांपैकी १६ कोटी ३९ लाख २५ हजार रुपये निधी खर्च झाला. त्याशिवाय, इतर ३४ योजनांतील घोळही पुढे आला. एकूण १०१ पैकी सहा योजनांचा ताळमेळ घेण्यात आला, तसेच वसुलीची कारवाई सुरू झाली. उर्वरित ९५ योजनांचा हिशेब पुढील वर्षात घेतला जाईल, असा पवित्रा पाणी पुरवठा विभागाच्या उपविभागांनी घेतला आहे.- या गावांतील योजना अर्धवट!बार्शीटाकळी तालुक्यातील परंडा, तामशी, काजळेश्वर, उमरदरी, पाराभवानी, भेंडीमहाल, महान, साहित, सुकळी, खेर्डा, राजनखेड, महागाव, भेंडगाव, महागाव माळी, चोहोगाव, लोहगड, सावरखेड. अकोट तालुक्यातील पिंप्री जैनपूर, चंडिकापूर, देऊळगाव, बोर्डी, जळगाव नहाटे. तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ बु., सदरपूर, धोंडा आखर, चितलवाडी, चांगलवाडी, खाकटा, दानापूर, खापरखेड, वडगाव रोठे. बाळापूर तालुक्यातील कळंबा बु., तामशी, झुरळ, कसुरा, सावरपाटी, मनारखेड, पिंपळगाव, सोनगिरी, खिरपुरी बु., कडोशी, व्याळा, बारलिंगा, कवठा, लोहारा. पातूर तालुक्यातील पांढुर्णा, पांगरा, डिग्रस, सोनुना, निमखेड, राहेर, सावरगाव, पळसखेड, अडगाव खु., सस्ती, भंडारज खु., खापरखेडा, हिंगणा वाडेगाव, सुकळी, अंबाशी, चतारी, पिंपळखुटा. मूर्तिजापूर तालुक्यातील बपोरी, दाताळा, नवसाळ, सोनोरी. अकोला तालुक्यातील लाखनवाडा योजनांचा समावेश आहे.