अकोला : संस्कृती संवर्धन समिती, अकोला वतीने हिंदू नववर्षानिमित्त शहरातील १११ मंदिरांना धर्म ध्वज प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आभासी पत्रकार परिषदेत संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा यांनी दिली
संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी विराट दुचाकी रॅली काढण्यात येते. मागील वर्षी व या वर्षी सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असल्याने ही रॅली रद्द करून यावर्षी शहरातील १११ मंदिरांना धर्म ध्वज प्रदान करण्यासाठी मान्यवरांचे विविध गट तयार केले असून, ते हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर शहरातील सर्व प्रमुख मंदिरांना दिले जाणार आहे. गत एक वर्षांत कोरोना महामारीच्या काळात कृतज्ञता म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांना भारतमातेची प्रतिमा भेटवस्तू म्हणून प्रदान करणार आहे. तसेच शहरातील काही प्रमुख मंदिरांसमोर व प्रमुख चौकात भव्य रांगोळी काढण्यात येणार आहे.
अशी माहिती संस्कृती संवर्धन समिती, अकोलाचे अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा, कार्याध्यक्ष हेमेंद्र राजगुरू, रा. स्व. संघ विभाग संघचालक नंदूजी देशपांडे, महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल, संयोजक महेश जोशी, सहसंयोजक स्वानंद कोंडोलीकर इंद्रायणी देशमुख, नरेंद्र राठी, पवन केडिया, राहुल राठी, ॲड. मोतिसिंग मोहता, नीलेश देव, प्रकाश घोगलिया आदी संस्कृती संवर्धन समितीचे सदस्य उपस्थित होते.
बाॅक्स
रक्तदान शिबिराचे आयाेजन
सध्या कोरोना काळात रक्ताची खूप गरज भासत आहे, अकोल्यातील नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात येते की, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये आपण अधिकाधिक संख्येने रक्तदान करावे.