रेमडिसीव्हीरचा साठा दहा दिवस पुरेल एवढाच शिल्लक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 10:22 AM2021-02-20T10:22:52+5:302021-02-20T10:23:04+5:30

Akola GMC and Sarvopchar Hospital News सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध रेमडिसीव्हीरचा साठा दहा दिवस पुरेल एवढाच शिल्लक आहे.

Remdesivir stock is enough for ten days! | रेमडिसीव्हीरचा साठा दहा दिवस पुरेल एवढाच शिल्लक!

रेमडिसीव्हीरचा साठा दहा दिवस पुरेल एवढाच शिल्लक!

Next

अकोला: सर्वोपचार रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या वाढल्याने रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा वापरही वाढला आहे. गत आठवडाभरापासून दररोज जवळपास २५ ते ३०रेमडिसिव्हीर व्हायलचा उपयोग होत आहे. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध रेमडिसीव्हीरचा साठा दहा दिवस पुरेल एवढाच शिल्लक आहे. गंभीर रुग्णांची संख्या वाढल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्या गंभीर रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयातच दाखल केले जाते. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयावरील ताण वाढत आहे. सर्वोपचार रुग्णालयात गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधीसाठा उपलब्ध असला, तरी रेमडिसीव्हीर इंजेक्शनचा वापर वाढल्याने उपलब्ध साठा कमी पडू लागला आहे. सद्यस्थितीत सर्वोपचार रुग्णालयात रेमडिसीव्हरचे ३०० व्हायल शिल्लक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दररोज यातील २५ ते ३० व्हायलची आवश्यकता भासत असल्याने हा साठा जेमतेम दहा ते बारा दिवस पुरेल एवढाच शिल्लक असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे मत आहे. गंभीर रुग्णांची संख्या अशीच झपाट्याने वाढल्यास रेमडिसीव्हीरचा तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

यापूर्वी दिवसाला ३ व्हायलची होती गरज

दिवाळीनंतर रुग्णसंख्येत कमालीची घट आली होती. या काळात गंभीर रुग्णांची संख्याही कमी होती. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात दिवसाला केवळ दोन ते तीन व्हायलचा वापर होत होता. मात्र, गत आठवडाभरात गंभीर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. त्या तुलनेत रेमडिसीव्हीरचा वापरही वाढला आहे.

ऑक्सिजन प्लानचीही प्रतीक्षा कायम

रेमडिसीव्हीर सोबतच ऑक्सिजनचीही गरज वाढली आहे. त्याअनुषंगाने सर्वोपचार रुग्णालयातील ऑक्सिजन प्लान्ट सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र या प्लान्टसाठी अद्यापही परवाना मिळाला नाही. त्यामुळे हे काम रखडल्याचे जीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात प्लान्टला परवाना मिळण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.

Web Title: Remdesivir stock is enough for ten days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.