अकोला : राज्यभर रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. या काळाबाजार प्रकरणात पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल १९ आरोपींना आतापर्यंत अटक केली असून यामधील एक आरोपी अल्पवयीन आहे. तर उर्वरित १८ आरोपींपैकी १७ आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. एका आरोपीला १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आनंदप्रसाद रामअभिलाष तिवारी असे आरोपीचे नाव असून त्याच्या घरातून आणखी एक रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील डॉक्टर सागर सहदेव मेश्राम २३ वर्षे यास अटक केली. मेश्राम याचे साथीदार असलेले आनंदप्रसाद रामअभिलाष तिवारी, वय २२ वर्षे, रा. कैलास टेकडी, सुमित महादेव वाघमारे, कोमल वानखडे, निकिता नारायण वैरागडे, कार्तिक मोहन पवार या सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यापूर्वी १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून या मधील १२ आरोपींना अटक करण्यात आली होती. एक मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या आरोपींना ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी पोलीस कोठडी संपल्याने आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आनंदप्रसाद रामअभिलाष तिवारी या एका आरोपीस १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर उर्वरित १७ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींनी सुमारे ५० पेक्षा अधिक रेमडेसिविर इंजेक्शन काळ्याबाजारात विकल्याचा उलगडा झालेला आहे. तर या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.