अकोला: महावितरणच्या विद्युत खांब, वितरण पेटी, डीपी, रोहित्र अशा विद्युत यंत्रणेजवळ अनेक फलक, पत्रके, फ्लेक्स, बॅनर्स, अनधिकृतपणे ठिकठिकाणी लावलेले आढळून येत आहेत. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काम करताना अडथळा निर्माण होत असून, अपघाताची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांनी २३ जानेवारी २०१९ पर्यंत सदर फ्लेक्स वा साहित्य स्वत:च काढून टाकावे, अन्यथा महावितरण कंपनी सदर साहित्य काढून नियमानुसार कारवाई करील, असा इशारा महावितरण कंपनीने दिला आहे.महावितरण कंपनीचे जिल्ह्यात शहरासह वीज पुरवठा करण्यासाठी ग्रामीण भागात महावितरण यंत्रणेचे मोठे जाळे असून खांब, वाहिन्या, रोहित्र वितरण पेट्या आहेत; मात्र अनेक व्यावसायिक, संस्था, जाहिरातदार वा इतर अनधिकृतपणे यावर फ्लेक्स बॅनर्स, होर्डिंग लावतात. हे लावणे बेकायदेशीर असून, सोबत विद्युत अपघातास आमंत्रण देणारेसुद्धा आहेत. महावितरणचे तांत्रिक कर्मचारी देखभाल दुरुस्तीची कामे करीत असताना त्यांना यामुळे अडथळा निर्माण होतो व अपघातसुद्धा होऊ शकतो. सोबतच सदर पत्रके वा फ्लेक्स लावताना खासगी व्यक्तीचासुद्धा विद्युत यंत्रणेला स्पर्श झाल्यास अपघात होऊ शकतो. त्यामुळे संबंधितांनी याची नोंद घेऊन वीज खांब व यंत्रणेवरील जाहिराती वा तत्सम साहित्य दिलेल्या मुदतीत काढून टाकावे, अन्यथा नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिला आहे.