अकोला: गत पाच महिन्यांपासूनच्या थकीत वेतनाच्या मागणीसाठी कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलनाचे शस्त्र उपसले. कामबंद आंदोलनामुळे मंगळवारी सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाली असून, अपघात कक्षात केवळ एकच डॉक्टर असल्याने परिस्थिती गंभीर आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे वेतन हे त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. विनावेतन कुटुंबाचा गाडा चालवावा तरी कसा, असा प्रश्न करत मंगळवारी निवासी डॉक्टरांनी सर्वोपचार रुग्णालयाच्या अपघात कक्षासमोर प्रशासनाविरोधात निदर्शने दिले. बहुतांश डॉक्टर शेतकरी कुटुंबातील असून, आतापर्यंत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आता डॉक्टरांवरही आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे आंदोलनकर्त्या निवासी डॉक्टरांनी म्हटले. दरम्यान, कामबंद आंदोलनाचा प्रभाव रुग्णसेवेवर दिसून आला. अपघात कक्षात केवळ एकच सीएमओ असून, एकट्या डॉक्टवर संपूर्ण अपघात कक्षाची जबाबदारी आली आहे. हीच परिस्थिती इतरही वॉर्डात असल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. महाविद्यालय प्रशासनाच्या आर्थिक मानसिक व शासकीय तणावाला त्रासून एखाद्या निवासी डॉक्टराने किंवा कुटुंबीयाने आत्महत्या केल्यास यासाठी अधिष्ठाता व महाविद्यालयाच्या प्रशासनास जबाबदार ठरविण्यात यावे, असेही यावेळी डॉक्टरांनी म्हटले.निवासी डॉक्टरांना अपमानजनक वागणूकप्रलंबित वेतनासंदर्भात विचारणा केल्यास महाविद्यालय प्रशासनातर्फे उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. शिवाय, अपमानजनक वागणूक दिली जात असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांकडून करण्यात आला आहे.अधिष्ठाता म्हणतात मोठी घटना झाल्यास पाहूनिवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव अपघात कक्षावर दिसून आला. या ठिकाणी एकच सीएमओ असून, त्याच्यावर संपूर्ण कक्षाची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळेला अपघात कक्षात गंभीर रुग्णांची संख्या वाढल्यास प्रशासनाची काय तयारी आहे, यासंदर्भात विचारणा केल्यास मोठी घटना झाल्यास आम्ही पाहून घेऊ, असे उत्तर अधिष्ठातांनी दिले.१६० डॉक्टरांच्या बदल्यात १२ डॉक्टरांची नियुक्तीकामबंद आंदोलनात ६० निवासी, तर १०० इंटर्न डॉक्टरांचा सहभाग असल्याने सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. यावर नियंत्रणासाठी महाविद्यालय प्रशासनातर्फे केवळ १२ प्राध्यापक डॉक्टरांची नियुक्ती केल्याची सांगण्यात येत आहे. या डॉक्टरांची नियुक्ती कुठे व कशा प्रकारे केली जाईल, हे अनाकलनीय आहे.