'कंटेनमेंट झोन'साठी निर्बंध; दूध, किराणा, औषध विक्रेत्यांना बाहेर निघण्यास मनाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 10:45 AM2020-05-15T10:45:57+5:302020-05-15T10:46:12+5:30
अकोला : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे पाहून तसेच कंटेनमेंट झोनमधील नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केल्या जात असल्याची ...
अकोला: शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे पाहून तसेच कंटेनमेंट झोनमधील नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केल्या जात असल्याची बाब लक्षात घेता या भागातील दूध, किराणा तसेच औषध विक्रेत्यांना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर निघण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या झोनमधील नागरिकांना नाकाबंदी केलेल्या प्रवेशद्वारापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा दिला जाणार आहे. या नियोजनासाठी मनपाची यंत्रणा कामाला लागली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसर कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ठरला आहे. प्रभाग क्रमांक ११ चा संपूर्ण परिसर, प्रभाग क्रमांक दोनमधील अकोटफैल परिसर तसेच जुने शहरातील खैर मोहम्मद प्लॉट आदी भागात कोरोना विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी १३ मे रोजी शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची प्रत्यक्षात पाहणी केली. यावेळी कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना वारंवार सूचना करूनही ते घराबाहेर निघत असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने पालकमंत्र्यांना देण्यात आली. नाकाबंदीवर तैनात केलेल्या पोलिसांची नजर चुकवून नागरिक प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जात असल्याची परिस्थिती आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास कोरोना विषाणूला प्रतिबंध घालणे शक्य होणार नसल्याचे पालकमंत्र्यांसह प्रशासकीय यंत्रणांच्या लक्षात आले. त्यावर कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना तसेच दूध, किराणा व औषध विक्रेत्यांना झोनच्या बाहेर निघण्यावर निर्बंध घालण्याचे निर्देश पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी महापालिका प्रशासनाला दिले. त्या अनुषंगाने या भागातील नागरिकांची गैरसोय टाळता यावी तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा, याकरिता महापालिकेच्या स्तरावर नियोजन केल्या जात असल्याची माहिती आहे.
प्रवेशद्वारापर्यंत उपलब्ध होतील जीवनावश्यक वस्तू
मनपाने घोषित केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील किराणा व्यावसायिक, दूध विक्रेता तसेच औषध विक्रेत्यांना साहित्याची गरज भासल्यास त्यांना कंटेनमेंट झोनबाहेरील परिचित व्यावसायिकाला संपर्क साधावा लागेल. संबंधित व्यावसायिक नाकाबंदी केलेल्या प्रवेशद्वारापर्यंत जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा उपलब्ध करून देतील. त्या ठिकाणी येऊन झोनमधील व्यावसायिकाला त्याचे साहित्य घेऊन जावे लागणार आहे.
प्रशासनाच्या प्रयोगाकडे लक्ष
यापूर्वी महापालिकेने बैदपुरा भागात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ओळखपत्र दिले होते. नाकाबंदीवर तैनात केलेल्या पोलिसांना संबंधित ओळखपत्र दाखवून प्रतिबंधित क्षेत्रातील व्यावसायिकांना शहरातून जीवनावश्यक साहित्याची खरेदी करणे सहज शक्य झाले होते; परंतु या भागातील नागरिकांच्या मनमानी कारभारामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे पाहून प्रशासनावर असा प्रयोग करण्याची वेळ ओढवली आहे. यावर प्रतिबंधित क्षेत्रातील सुज्ञ नागरिकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.