जलसंधारणाच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध : प्रशासन लावणार सूचना फलक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 02:31 PM2018-06-30T14:31:48+5:302018-06-30T14:35:25+5:30
शेततळ्यांमध्ये बुडाल्याने मृत्यूच्या घटना घडत असल्याने, जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात येत असल्याचे सूचना फलक जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत.
अकोला : जलयुक्त शिवार अभियान आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमध्ये शेततळ्यांची कामे करण्यात आली असून, पावसामुळे शेततळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठाही उपलब्ध झाला आहे; मात्र शेततळ्यांमध्ये बुडाल्याने मृत्यूच्या घटना घडत असल्याने, जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घालण्यात येत असल्याचे सूचना फलक जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत. त्यामुळे शेततळ्यांच्या धोक्यापासून जीव सांभाळण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात सन २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षात ३ हजार ९३२ जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामध्ये ७२२ शेततळ्यांसह ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांध, सिमेंट नाला बांध खोलीकरण, नाला खोलीकरण, डोह खोदकाम, गाव तलाव, पाझर तलाव, सिंचन तलाव, कोल्हापुरी बंधाºयांची दुरुस्ती इत्यादी कामांचा समावेश आहे, तसेच राष्ट्रीय महामार्ग विकासकामांना जलसंधारणाच्या उपचारांची सांगड घालून जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गानजीक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ७२ जलसंधारणाच्या कामांना परवानगी देण्यात आली. त्यापैकी ६० जलसंधारणांची कामे पूर्ण करण्यात आली असून, त्यामध्ये २८ शेततळ्यांसह नाला खोलीकरण, पाझर तलाव, गाव तलावांच्या कामांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ९९२ जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली असून, पावसामुळे जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, शेततळ्यात बुडाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना २८ जून रोजी कोळंबी येथे घडली, यापूर्वीदेखील काही ठिकाणी अशा घटना घडल्या. त्यामुळे शेततळ्यांसह जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या ठिकाणी निर्माण झालेल्या धोक्यापासून जीव सांभाळण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जिल्ह्यात शेततळ्यांसह जलसंधारणाची कामे करण्यात आलेल्या आणि पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जलसंधारणाच्या कामातून पाणीसाठा निर्माण झालेल्या ठिकाणी जाण्यासाठी निर्बंध घालण्यात येत आहेत, असे सूचना फलक जिल्हा प्रशासनामार्फत लावण्यात येणार आहेत.