अकोला : अमरावती परीक्षा मंडळांतर्गत इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल २९ जुलै रोजी लागणार आहे. ३0 हजार ७८५ विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निकाल बुधवारी लागणार असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये निकालाविषयी उत्सुकता आहे. भूगोल विषयाचा पेपर रद्द झाल्यामुळे या विषयात किती गुण मिळतात, याविषयीची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. विभागात जिल्ह्याचा निकाल कसा लागतो, याकडेही शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.दहावीची परीक्षा करिअरचा टर्निंग पॉइंट असल्याने विद्यार्थी, पालक परीक्षेला घेऊन अत्यंत गंभीर होते. मार्चमध्ये झालेल्या दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात ११९ परीक्षा केंद्रं होती. जिल्ह्यातून एकूण ३0 हजार ७८५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झाली होती. दहावी परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानावर भर देण्यात आला होता. दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून १६ हजार ९१0 मुले आणि १३ हजार ८७५ मुली असे एकूण ३0 हजारावर विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेदरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शिक्षण विभागाने इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द केला होता. या विषयामध्ये विद्यार्थ्यांना किती गुण मिळतात, याविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता आहे, तसेच जिल्ह्याच्या एकंदरीत निकालाकडेही शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये!कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांनी दहावीचा निकाल पाहण्यासाठी शाळेत येऊ नये. गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी घरी राहूनच आॅनलाइन निकाल पाहावा. आवश्यकता असल्यास मोजक्याच विद्यार्थ्यांना संपर्क करून शाळेत बोलाविण्यात येणार आहे, असे शिक्षण विभागाने कळविले आहे.