जीएमसीत नेत्र शस्त्रक्रिया पुन्हा सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:32+5:302021-07-05T04:13:32+5:30
अकोला : कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे नॉनकोविड वैद्यकीय सेवा पुन्हा प्रभावित झाली होती. त्यामुळे विविध शस्त्रक्रियाही रखडल्या होत्या; मात्र आता ...
अकोला : कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे नॉनकोविड वैद्यकीय सेवा पुन्हा प्रभावित झाली होती. त्यामुळे विविध शस्त्रक्रियाही रखडल्या होत्या; मात्र आता कोविडची ही लाट ओसरू लागल्याने रखडलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने वाॅर्ड क्रमांक २१ नेत्र रुग्णांसाठी पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनच नॉनकोविड आजाराच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे रुग्णांचे आजार वाढू लागले. दरम्यान, कोविडची पहिली लाट ओसरल्यानंतर तीन महिन्यांच्या काळात शासकीय रुग्णालयांमध्ये विविध शस्त्रक्रियांसोबतच नेत्र शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. सर्वकाही सुरळीत सुरू असताना फेब्रुवारी महिन्यात पुन्हा काेविडची दुसरी लाट आल्याने नेत्र शस्त्रक्रिया पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या दरम्यान सुमारे ७०० पेक्षा जास्त नेत्र शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. सध्या कोविडची दुसरी लाट ओसरू लागल्याने शस्त्रक्रिया विभाग पुन्हा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यापूर्वी त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.
नेत्र ओपीडीही सुरू
शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यापूर्वी नेत्र ओपीडी सुरू करण्यात आली.
त्यानंतरच रुग्णांच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील नेत्रतज्ज्ञांनी दिली.
कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे बंद झालेला नेत्र शस्त्रक्रिया विभाग पुन्हा सुरू करण्यात आला. त्यासंदर्भात सूचनाही प्राप्त झाल्या होत्या.
- डॉ. भावेश गुरुदासानी, नेत्रतज्ज्ञ, जीएमसी, अकोला