औषधांसाठी किरकोळ विक्रेत्यांची नागपूरकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:49 AM2020-04-14T10:49:11+5:302020-04-14T10:49:26+5:30
काही किरकोळ औषध विक्रेत्यांनी नागपूर येथून दवाबाजारातून औषधी आणण्यासाठी धाव घेणे सुरू केले आहे.
- सचिन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना या तीव्र संसर्गजन्य विषाणूंना रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन करण्यात आले आहे; मात्र जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली असून, यामध्ये औषध व्यावसायिकांची मोठी भूमिका आहे. दवा बाजार तसेच ठोक औषध विक्रेत्यांकडे आतापर्यंत असलेला साठा संपत आल्याने किरकोळ विक्रेत्यांनाही औषधाचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे काही किरकोळ औषध विक्रेत्यांनी नागपूर येथून दवाबाजारातून औषधी आणण्यासाठी धाव घेणे सुरू केले आहे.
जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांना दवा बाजार तसेच इतर ठोक औषधी विक्रेत्यांकडून औषधांचा साठा पुरविण्यात येतो. विविध कंपन्यांच्या औषधांच्या डिलरशीपही अकोल्यात असल्याने त्यांच्या औषधी ट्रकनेच अकोल्यात आणण्यात येतात; मात्र कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर बहुतांश कंपन्यांना वाहतूक करण्यास अडचणी निर्माण झाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या कंपन्यांचा औषधांचा साठा आता अकोल्यापर्यंत येत नसल्याने किरकोळ औषध विक्रेत्यांना बहुतांश महत्त्वाची औषधी मिळत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे औषध विक्रेत्यांनी औषधांचा साठा आणण्यासाठी नागपूर येथे धाव घेतली आहे. अकोला शहरातील बहुतांश मोठ्या औषध दुकानांचे संचालक नागपूर येथून कारने औषधी आणत असून, यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून परवाना घेण्यात येत आहे. त्यांनी परवाना दिलेल्या वाहनांमधूनच अकोल्यात औषधी आणण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
हा औषधसाठा आणण्याचा प्रयत्न
शहरातील औषध विक्रेते नागपूर येथील दवा बाजारातून एन ९५ मास्क, दोन पदरी तसेच तीन पदरी मास्क, हॅन्ड वॉश, हॅन्ड सॅनिटायझर, रक्तदाबाची औषधी, मधुमेहाची औषधी तसेच जळीत रुग्णांसह हृदयरुग्णांच्या औषधी आणण्यासाठी आटापिटा करण्यात येत आहे. शहरातील बहुतांश औषधी विक्रेते आता नागपूर येथून औषधांचा साठा आणत असल्याने अकोलेकरांना चिंतेची गरज नसल्याची माहिती आहे.
वाहतूक खोळंबल्याने अडचणी
औषधांचा पुरवठा करणाऱ्या बहुतांश राज्यातील वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. बाहेर राज्यातील वाहने औषध घेऊन आल्यानंतर परत जाण्यास त्यांना अडचणी येत असल्याचेही वास्तव आहे. त्यामुळे बºयाच कंपन्यांचा औषध साठा अकोल्यात येत नसल्यामुळे आता किरकोळ औषध विक्रेत्यांनी कारनेच औषध आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.