- प्रशांत विखे
तेल्हारा : तेल्हारा येथील कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कापूस विविध कारणांनी परत करण्यात येत असल्याचे वृत्त लोकमतने १६ मे रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी खरेदी केंद्राला भेट दिली. तसेच परत केलेल्या कापसाचे पुन्हा ग्रेडींग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एफएक्यू असलेला कापूस नाकारला असेल तर ग्रेडरवार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.केंद्र शासनाने सीसीआयमार्फत व कापूस पणन महासंघाने फेडरेशन मार्फत कापूस खरेदी सुरू केली आहे. मात्र, ही कापूस खरेदी खूपच विलंबाने सुरू झाली आहे.त्यातच लॉकडाउनमुळे मोजक्याच शेतकºयांचा कापूस मोजल्या जात असल्याने अनेक शेतकºयांना प्रतिक्षा आहे. अशातच सीसीआय व फेडरेशनवर नंबर प्रमाणे शेतकरी कापूस आणत असतांना तेथील केंद्र प्रमुख ग्रेडर हे केवळ एफएक्यु ग्रेडच्या नावावर शेकडो क्विंटल कापूस परत पाठवीत आहेत. खाजगी व्यापारी कापूस घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. कापूस नोंदणी शेतकरी बंद पडली असून आतापर्यंत तालुक्यात तीन हजाराच्यावर नोंदणी झाली असून दररोज २० या प्रमाणे केवळ तीनशेच शेतकºयांचा कापूस मोजल्या गेला आहे. त्यामुळे कापुस केव्हा मोजल्या जाईल व त्याचे पैसे केव्हा मिळतील अशा आशयाची वस्तुनिष्ठ बातमी लोकमतने शनिवारी प्रकाशित करताच सहकार खाते खडबडून जागे झाले व थेट जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांनी तेल्हारा व हिवरखेड येथील कापूस खरेदी गाठले व शेतकºयांची समस्या ऐकून घेतली. यावेळी उपनिबंधक डॉ प्रवीण लोखंडे यांनी ग्रेडर व शेतकरी ,बाजारसमितीचे पदाधिकारी ,जिनिग फक्ट्रीचे मालक यांच्यासोबत चर्चा करून दररोज किमान पन्नास शेतकºयांचा कापूस मोजल्या गेल्या पाहिजे व जो कापूस एफएक्यु नसल्याच्या नावावर परत केला असेल त्याचा जिनिगचे मालक ,बाजारसमितीचा कर्मचारी, ग्रेडर व एक व्यापारी असे मिळून पंचनामा करून त्याचे सॅम्पल बाजार समितीमध्ये ठेवण्यात येईल व दर रविवारी जमा झालेल्या सॅम्पलचे थर्ड ग्रेडर कडून आॅडिट होईल. यामध्ये एफएक्यू असलेला कापूस नाकारल्याचे समोर आल्यास ग्रेडरवार कारवाई करण्यात येइल असा इशारा डॉ.लोखंडे यांनी दिला.