अकोला: बदलत्या वातावरणासोबतच स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. गत दोन आठवड्यात जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे दोन बळी गेले. यातच एप्रिल संपला तरी राज्यात स्वाइन फ्लूचे लसीकरण अद्याप झाले नाही. शिवाय ज्या भागात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले त्या परिसरातदेखील स्वाइन फ्लूचे सर्वेक्षण करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे.गत महिनाभरात शहरात स्वाइन फ्लूचे चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये एका गर्भवतीचा समावेश आहे. चारपैकी दोघांचा बळी गेला. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला; परंतु प्रत्यक्षात सर्वेक्षण करून परिसरातील नागरिकांना लस दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. हीच स्थिती राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही दिसून येते. नियमानुसार स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळताच तो ज्या परिसरात वास्तव्यास आहे, त्या भागात सर्वेक्षण करणे गरजेचे आहे, तसेच स्वाइन फ्लूचा संभाव्य धोका टाळण्यासाठी रुग्णाच्या कुटुंबीयांसोबतच परिसरातील नागरिकांना लस देणे आवश्यक आहे; मात्र राज्यात हा प्रकार कुठेच होत नसल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य यंत्रणेकडे स्वाइन फ्लूची प्रतिबंधात्मक लसदेखील उपलब्ध नसल्याने स्वाइन फ्लूचा धोका आणखी वाढला आहे. अशा परिस्थितीत स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.लक्षणेसर्दी, ताप, थंडी वाजणे, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब.हे करा
- शिंकताना नाकावर रुमालाचा वापर करावा
- वारंवार हात धुवा
- गर्दीच्या ठिकाणी मास्क लावूनच जावे
- पौष्टिक आहार घ्यावा
- नियमित व्यायाम करावा
- संसर्ग टाळा
- सर्दी, खोकला यांसारखे आजार किरकोळ वाटत असले, तरी ते एकापासून दुसऱ्यापर्यंत पोहोचतात,
- त्यामुळे आपल्यापासून इतरांना संसर्ग होण्यापासून टाळा.
आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा संसर्गजन्य आजार असून, नागरिकांनी सतर्क राहावे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.