अकोला: सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सिटी कोतवाली ते शिवाजी पार्कपर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू असून, भाजप लाेकप्रतिनिधी व मनपातील सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे सदर काम खाेळंबल्याचा आराेप करीत मंगळवारी मनपातील काॅंग्रेसचे गटनेता तथा विराेधी पक्षनेता साजिद खान यांच्यासह कायकर्त्यांनी माळीपुरा चाैकात रास्ता राेकाे केला.
शहरातील सिमेंट रस्त्यांची अवघ्या सहा महिन्यांतच वाट लागल्याचे समाेर आले आहे. ‘पीडब्ल्यूडी’मार्फत सिटी काेतवाली ते टिळक राेड ते छत्रपती शिवाजी महाराज पार्कपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम मागील तीन वर्षापासून सुरू असून, संथगतीमुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच माळीपुरा चौकातून लक्कडगंजकडे जाणाऱ्या चाैकातील काम अधर्वट स्थितीत असून, या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यासंदर्भात साजिद खान पठाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना २१ जून २०१९ व १९ ऑक्टोबर २०२० रोजी पत्र दिल्यानंतरही कामाला सुरुवात झाली नसल्याचे समाेर आले. या विभागाला झाेपेतून जागे करणयासाठी मंगळवारी दुपारी माळीपुरा चाैकात काॅंग्रेसच्यावतीने रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले. आंदाेलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दिनकर नागे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन १८ नोव्हेंबरपासून रस्त्याचे काम सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक मोहम्मद इरफान, समाजसेवक मोईन खान, काँग्रेस आरोग्य सेलचे मोहम्मद युसुफ, इस्माईल टीव्हीवाले, मंजूर अहेमद, विक्की भाई, रेहान कुरेशी, अख्तर चौहान, अहेमद अली, जहीर भाई, बाबा भाई, युनुस मामू, मोहम्मद सादिक आदी काँग्रेसजन उपस्थित होते.