अकोला: जुने शहरातील डाबकी रोड परिसरात चिडीमारांनी कळस गाठला असून, महाविद्यालयीन, शाळकरी मुलींची छेड काढण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. शाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्गांच्या परिसरात दिवसाढवळ््या मुलींची छेड काढल्या जात असल्याने अखेर सर्वसामान्य नागरिकांनी टवाळखोर व चिडीमारांचा बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरली आहे. भविष्यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी डाबकी रोडवरील जुना जकात नाक्याजवळ पोलीस चौकीची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जुने शहरातील डाबकी रोड परिसर संवेदनशील म्हणून ओळखल्या जातो. या परिसरातील गोडबोले प्लॉट, चिंतामणी नगर, वानखडे नगर, आश्रय नगर आदी भागात खासगी शाळा, कनिष्ठ तसेच महाविद्यालयांमुळे विद्यार्थ्यांची मोठी रेलचेल राहते. मागील काही दिवसांपासून शाळा परिसर तसेच महाविद्यालय परिसरालगत चिडीमार व टवाळखोर युवकांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. महाविद्यालयीन तसेच शाळकरी मुलींची दिवसाढवळ््या छेड काढणे, त्यांना अश्लील हातवारे करणे, जबरदस्तीने थांबवून त्यांची कुचंबणा करण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. बदनामीच्या भीतीपोटी बहुसंख्य विद्यार्थिनी व त्यांचे पालक पोलीस तक्रार करण्यास धजावत नाहीत. या सर्व प्रकाराला वैतागलेल्या नागरिकांसह गजानन नगर भागातील व्यावसायिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह डाबकी रोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील सोळंके यांना निवेदन सादर करून या प्रकाराला आळा घालण्याची मागणी केली आहे. चिडीमारांना हटकल्यास ते शिवीगाळ करीत असल्याने भविष्यात डाबकी रोडवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी जुना जकात नाक्याजवळ पोलीस चौकी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेनेचे जि.प. सर्कल प्रमुख दिनेश सरोदे, दीपक बोरकर, राजदीप टोहरे, कैलास भालेराव, दीपक मराठे, रूपेश फाटे, अमोल सरोदे, अशोक भिसे, सचिन रायलकर, संजय बेलूकर, विनोद चतरकार, निशांत ताथोड, नितीन कळमकर, गोपाल खेडकर, संजय चौधरी, महेश जोध, दीपक डाहाके, प्रमोद शहारकर, गोपाल फुलवाले, पांडुरंग गावंडे, डॉ. संदीप रत्नपारखी यांच्यासह असंख्य व्यावसायिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.चिडीमार पथक कागदावरडाबकी रोड पोलिसांकडून मध्यरात्री गस्त घालून औपचारिकता निभावल्या जात असली तरी चिडीमार, प्रेमी युगुलांचा वाढता उच्छाद पाहता दिवसासुद्धा पेट्रोलिंगची गरज असल्याची मागणी होत आहे. तसे होत नसल्याने छेडखानीच्या मुद्यावरून शाळकरी व महाविद्यालयीन युवकांमध्ये हाणामाऱ्या होण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. डाबकी रोड पोलिसांचे चिडीमार पथक कागदावर असल्यामुळे अनुचित प्रकार होण्याची शक्यता बळावली आहे.
प्रेमी युगुलांची गोडबोले उद्यानकडे धाव!दिवस असो वा रात्र, गोडबोले प्लॉटमधील गोडबोले उद्यान, चिंतामणी नगर तसेच कॅनॉल रस्त्यावर अल्पवयीन प्रेमी युगुलांच्या संख्येत वाढ झाल्याने स्थानिक रहिवासी कमालीचे वैतागले आहेत. त्यांना हटकल्यास नागरिकांना शिवीगाळ करणे, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. पोलिसांना पेट्रोलिंगचा विसर पडल्यामुळे की काय, चिडीमारांसह प्रेमी युगुलांच्या मनोधैर्यात वाढ झाल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जातो.