अकोला: तेलंगणातील हैदराबाद येथील रहिवासी एक दाम्पत्य हैदराबाद अजमेर एक्स्प्रेसने शुक्रवारी प्रवास करीत असताना या एक्स्प्रेसवर हिंगोली रेल्वे स्टेशननंतर दरोडा टाकण्यात आला. यावेळी दरोडेखोरांनी रेल्वेतील प्रवासी प्रफुल्ल खिरडे यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला आहे.हैदराबाद येथील रहिवासी प्रफुल्ल रामभाऊ खिरडे हे त्यांच्या पत्नीसह हैदराबाद ते अकोला या दरम्यान हैदराबाद अजमेर एक्स्प्रेसने शुक्रवारी दुपारी प्रवास करीत असताना दुपारी २ वाजताच्या सुमारास हिंगोली रेल्वे स्टेशनच्या काही अंतर समोर ही गाडी आल्यानंतर पिवळे शर्ट घालून असलेल्या एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या पत्नीच्या पर्समधील रोख ७०० रुपये एक लाख २५ हजार रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे मंगळसूत्र, ५० हजार रुपये किमतीचा दोन तोळ्यांचा चपळा हार, २० हजार रुपये किमतीचा मोबाइल, एटीएम कार्ड, दस्तऐवज असा एकूण २ लाख ५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून पळविला. त्यानंतर प्रफुल्ल खिरडे यांनी एक्स्प्रेस थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र टीसी आणि पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. त्यानंतर वाशिम येथे तक्रार देण्यासाठी त्यांनी स्टेशन मास्टर यांना विनंती केली असता, त्यांनीही रेल्वे थांबविली नाही. त्यामुळे खिरडे यांनी अकोल्यात येताच रेल्वे पोलीस ठाण्यात या दरोड्याची तक्रार दिली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रेल्वे पोलिसांनी सुरू केली होती.