सात लाखांच्या खंडणीसाठी अकोल्यातील चौघांनी बुलडाणा जिल्ह्यातील इसमास ठेवले डांबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 06:18 PM2018-01-10T18:18:25+5:302018-01-10T18:26:33+5:30
बाळापूर : बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील शे. अकील शे. रफीक (५० ) यांना अकोला येथील चौघा जणांनी ६ जानेवारी रोजी बाळापूरमधून जबरदस्तीने पळवून नेऊन तीन दिवस त्यांना डांबून ठेवले.
बाळापूर : बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील शे. अकील शे. रफीक (५० ) यांना अकोला येथील चौघा जणांनी ६ जानेवारी रोजी बाळापूरमधून जबरदस्तीने पळवून नेऊन तीन दिवस त्यांना डांबून ठेवले. त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर कॉल करून सात लाख रुपयांची खंडणी मागितली.ती रक्कम न दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत शे.फैद्दान शे.अकील यांच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शे.अकील यांची सुटका केली. तसेच कार जप्त करुन एका आरोपीला अटक केली आहे.
साखरखेर्डा येथील शे. अकील शे. रफीक हे कामासाठी अकोला येथे आले असताना ते साखरखेर्डा येथे परत जात असताना ६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता एम. एच.३० ए.एफ. ८१०६ क्रमांकाच्या कारमधून शे. युनूसखाँ जब्बारखाँ सिंधिकँम्प रा .अकोला व इतर तिघे बाळापुरात आले. तेथे त्यांनी शे.अकील यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेले. त्यांना ९ जानेवारीपर्यत काटेपूर्णा येथील झोपडपट्टीत डांबून ठेवले. त्यानंतर शे.अकील यांच्या मोबाईलवरून शे.फैद्दान शे. अकील यांना कॉल करून आरोपींनी त्यांना सात लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. सदर रक्कम न दिल्यास शे.अकील यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या अपहरणकर्त्यांविरोधात शे. फैद्दान शे. अकील यांनी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये ९ जानेवारी रोजी रीतसर फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी ९ जानेवारीच्या रात्रीच काटेपुर्णा येथे जाऊन शे. अकील शे रफीक यांना अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सोडविले. या प्रकरणी आरोपी शे. युनुसखाँ जब्बारखाँ याला ताब्यात घेतले. तसेच अपहरणासाठी वापरलेली कार जप्त केली. दरम्यान या अपहरण व खंडणी प्रकरणातील अन्य तीन आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी आरोपी युनूसखॉ जब्बारखाँ व अन्य अनोळखी तीन आरोपींविरुद्ध भा.दं.वि.च्या ३६४(अ), ३६३,३८६ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वाघमोडे हे.काँ. शुद्धोधन इंगळे , हे. काँ. जोशी करीत आहेत .(तालुका प्रतिनिधी)